⁠ 
रविवार, नोव्हेंबर 17, 2024
Home | बातम्या | काँग्रेसशासित राज्यांमध्ये योजनांचा बोजवारा; भाजपाचा हल्लाबोल

काँग्रेसशासित राज्यांमध्ये योजनांचा बोजवारा; भाजपाचा हल्लाबोल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहचली आहे. महायुती व महाविकास आघाडीने मतदारांवर आश्वासनांचा पाऊस पाडला आहे. काँग्रेस व महाविकास आघाडीने आपल्या जाहीरनाम्यात महिलांना दरमहा तीन हजार रुपये, शेतकरी कर्जमाफी अशी आश्वासने दिली आहेत. मात्र अशीच आश्वासने काँग्रेसने हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा या तिन्ही राज्यात दिली होती. तेथे विजयी झाल्यानंतर या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. या तिन्ही राज्यातील जनतेची फसवणूक झाल्याची भावना असल्याचा दावा भाजपाने केला आहे. या तीन राज्यातील जनतेला फसवणाऱ्या काँग्रेसला महाराष्ट्रात यश मिळणार नाही असा विश्वास महायुतीच्या नेत्यांना वाटत आहे.

कर्नाटकमध्ये सर्व योजनांचा बोजवारा
कर्नाटक विधानसभा निवडणुकी काँग्रेसने गृहलक्ष्मी योजनेच्या माध्यमातून महिलांना ठराविक रक्कम देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता याच योजनेवरुन काँग्रेसवर महिलांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. या योजनेचे अनेक हप्ते थकले आहेत. चुकीच्या पध्दतीने या योजनेचे अंमलबजावणी केल्याने योजनेचा बोजवारा उडाल्याचा दावा भाजपाने केला आहे. गृह ज्योती योजनेच्या अंतर्गत 200 युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासन देखील काँग्रेसने दिले होते. मात्र वीज दरात प्रति युनिट तीन रुपयांनी वाढ केली आहे.

परिवहन महामंडळाकडे डिझेललाही पैसे नाहीत
अन्न भाग्य योजनेच्या अंतर्गत राज्यातील एक कोटी 15 लाख लोकांना दहा किलो तांदूळ मोफत देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र सरकार स्थापनेच्या एक वर्षानंतर काँग्रेसने आश्वासनानुसार तांदळाचा एक दाणासुद्धा दिलेला नाही. लोकांना सध्या जे धान्य मिळत आहे, ते पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत दिले जात आहे, असा आरोप देखील भाजपाने केला आहे. महिलांना मोफत बस प्रवास देणारी शक्ती योजना कर्नाटक काँग्रेसने सुरू केले. या योजनेचा खर्च भागवण्यासाठी सरकारने बसेसची संख्या कमी केली तसेच ड्रायव्हर आणि कंडक्टर यांच्या वेतनात देखील कपात केली. परिवहन महामंडळाकडे डिझेलला देण्यासाठी पैसेही शिल्लक नसल्याचे कर्नाटक भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

तरुणांच्या तोंडाला पाने पुसली
बेरोजगार पदवीधराला 3000 रुपये आणि पदविका धारकाला पंधराशे रुपये देण्याचे आश्वासन देखील कर्नाटक कॉंग्रेसकडून देण्यात आले होते. मात्र निधीच्या अभावी ही योजना बंद करावी लागणार असल्याचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी म्हटले आहे. पोलीस, अंगणवाडी कार्यकर्ते यांच्या वेतनात वाढ करण्याचे आश्वासन कर्नाटक काँग्रेसने दिले होते मात्र ही आश्वासने देखील अद्याप अपूर्ण असल्याचे तेथील तरुणांचे म्हणणे आहे.

तेलंगणमध्ये काँग्रेसने महिलांना फसविले
विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान तेलंगणातील काँग्रेसने महिलांना दरमहा अडीच हजार रुपयांचे आश्वासन दिले होते. मात्र तेथे सरकार स्थापन होवून दहा महिने उलटले तरी महिलांना पैसे मिळालेले नाहीत. कल्याण लक्ष्मी योजनेच्या अंतर्गत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्याक समाजातील नवविवाहितेला दहा ग्रॅम सोने आणि एक लाख रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र निवडणुकीनंतर काँग्रेसला स्वत:च्या आश्वासनाचा विसर पडला असल्याचा दावा भाजपाने केला आहे.

अनेक आश्वासनांचा विसर काहींची अर्धवट अंमलबजावणी
बेरोजगार तरुणांना दरमहा चार हजार रुपये देणे, गृह ज्योती योजनेच्या अंतर्गत 200 युनिट वीज मोफत देणे, शेतकऱ्यांसाठी रायतू भरवसा योजनेच्या अंतर्गत एकरी 15000 रुपये देणे या आश्वासनांचा काँग्रेसला विसर पडला आहे. सत्तेत आल्यानंतर शंभर दिवसात महालक्ष्मी, रायतू भरवसा, युवा विकास योजना साकारू, अशी अनेक वचने देण्यात आली. मात्र या सगळ्या योजना अजूनही कागदावरच राहिल्या आहेत. शेतकऱ्यांना दिलेले दोन लाख रुपयांच्या कर्जमाफीचे आश्वासन देखील अर्धवट राहिले आहे.

हिमाचलमध्ये लाडक्या बहिणींसह सर्वसामान्य व शेतकऱ्यांची फसवणूक
हिमाचल प्रदेशमध्ये इंदिरा गांधी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना प्रतिमा दीड हजार रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र सत्तेत येताच काँग्रेसने योजनेच्या नियमांमध्ये बदल केल्याने अनेक महिला लाभापासून वंचित राहिल्या. राज्यात तीनशे युनिट वीज मोफत देण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले होते. मात्र मोफत वीज सोडाच असलेल्या विजेचे दर देखील काँग्रेसने वाढवून ठेवले आहेत. दूध दराच्या बाबतीत दिलेले आश्वासन देखील हवेतच विरले आहे. बेरोजगारी कमी करणे, शेतकऱ्यांकडून दोन रुपये प्रती किलो दराने गोवर खरेदी करणे, प्रत्येक गावात मोबाईल क्लिनिक सुरू करणे आदी आश्वासनांबाबतही काँग्रेसने फसवणूक केली असल्याचा आरोप भाजपाकडून होत आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.