जळगाव लाईव्ह न्यूज । हेडिंग वाचून असं वाटत असेल कि आम्ही जळगावकरांना ‘एप्रिल फुल’ करतोय. पण तसं काही नाहीये… अगदी खरंय… नाथाभाऊंची (Eknathrao Khadse) इच्छा होती कि सुरेशदादा (Sureshdada Jain) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे…
खान्देशात कोणाला पण विचारलं कि दुश्मनी कशी असते तर कोणी पण सांगेल नाथाभाऊ आणि सुरेशदादांसारखी… दोघे एकमेकांचे कट्टर विरोधक… कधीकाळी सरपंच असणारे नाथाभाऊ आता मागील निवडणुकीत मुख्यमंत्रीपदासाठीचे प्रमुख दावेदार होते. फडणवीसांनी खान्देशातीलच एका संकटमोचकाच्या माध्यमातून त्यांचा पत्ता कसा कट केला हि गोष्ट वेगळी. भाजपचे एकनिष्ठ (हो.. हो.. २३ ऑक्टोबर २०२० पर्यन्तच) नाथाभाऊंनी खान्देशात भाजपची पायामुळं मजबूत करण्यासाठी लोटगाडीवर स्पीकर फिरवून प्रचार केलाय.
याउलट होते आमचे सुरेशदादा जैन…. दादांनी इंदिरा काँग्रेस पासून सोशालिस्ट काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी परत शिवसेना असे अनेक पक्ष बदलले. पण एक मानावं लागेल दादांनी जळगाव शहरावरील आपले वर्चस्व कधी कमी होऊ दिले नाही. अनेकांनी दादांविरोधात अनेक प्रयत्न केले; पण दादा कायमच वरचढ राहिले. दादांनी सलग ७ वेळा वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणुकीला उभं राहून आमदारकी जिंकलीये.
नाथाभाऊ आणि सुरेशदादा यांच्यात स्थानिक स्वराज्य संस्थेवर कोणाची पकड मजबूत आहे यावरून सुरु झालेली वर्चस्वाची लढाई नंतर कट्टर शत्रुत्वात बदलली. अतिशय व्यक्तिगत स्थरावर गेलेल्या या लढाईत नेमकं कोण जिंकलं कोण हरलं हे त्या दोघांना देखील कळत नसेल. ते दोघे यातून काय गमावून बसलेत हे केवळ त्या दोघांनाच माहित. पण खान्देशाने पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद गमावले हे मात्र नक्की.
हे देखील वाचा : जळगावकरांना सुरेशदादांची आठवण पुन्हा येतेय; व्यक्तीप्रेम नव्हे शहराच्या विकासाशी आहे थेट संबंध…
मात्र एकेकाळी नाथाभाऊंची इच्छा होती कि सुरेशदादा मुख्यमंत्री झाले पाहिजे. हो अगदी खरं वाचताय… हे स्वतः एकनाथ खडसेंनी जाहीररीत्या सांगितलं आहे. १९९९ च्या निवडणुकीत मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वात युती सरकारला मोठा धक्का बसला होता. सत्ता स्थापनेसाठी जागा कमी पडत होत्या. त्यात मुख्यमंत्रीपदासाठी भाजप आणि शिवसेनेत चढाओढ होती ती वेगळीच.
शरद पवारांनी सोनिया गांधींच्या परदेशी जन्माचा मुद्दा काढून काँग्रेस सोडत स्वतःचा वेगळा मार्ग निवडला होता. त्यामुळे त्यांचे पण एकत्र येणे कठीणच होते. राज्यात त्रिशंकू परिस्थिती होती. शिवसेना-भाजप युतीला १० आमदारांची गरज होती. पण हे आमदार फोडणार कोण? यासाठी हवा होता कोणी तरी पक्का खमक्या व्यापारी….
सुरेशदादा जैन. दादा तेव्हा शिवसेनेत होते. पक्ष सोडण्याचा त्यांचा दांडगा अनुभव होता. विशेष म्हणेज दादा पक्के व्यापारी कोणाची कोणती नस दाबली कि काम होईल दादांना चांगलेच माहित होते. आता विषय अडकला फक्त मातोश्रीवर…. युती सरकारचे रिमोट कंट्रोल बाळासाहेबांच्या हातात होते. साहेबांशी कोण बोलणार…
यावेळी नाथाभाऊंनी पुढाकार घेऊन साहेबांशी बोलण्याचे ठरवले. भाऊंनी नितीन गडकरींना हि योजना समजावून सांगत त्यांना घेऊन मातोश्री गाठले. बाळासाहेबांना संपूर्ण योजना समजावून सांगत शिवसेनेचा मुखमंत्री कसा होईल हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु, साहेबांनी यासर्व गोष्टीला सरळ नकार दिला.
एकनाथराव खडसेंच्या सांगण्यानुसार, “राज्याची सत्ता व्यापारी प्रवृत्तीच्या हाती सोपवायची नाही.” अशी ठाम भूमिका बाळासाहेबांनी घेतली. यामुळे ठरलेला सर्व ‘प्लॅन’ रद्द करावा लागला. यात आता किती खरं किती खोट हे स्वतः सुरेशदादा किंवा नाथाभाऊंचं स्पष्ट करू शकतील.
लेख आवडल्यास शेअर करायला विसरू नका.