⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 16, 2024

सावधान : आज जळगावात ९९२ कोरोना बाधित आढळले; शहरात सर्वाधिक ४३० रुग्ण

0
corona-updates

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२१ । जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या काही केल्या कमी होत नाही. दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होत असून आज ९९२ नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आजच ७१६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. दरम्यान, आज ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव जिल्ह्यात आता एकुण ७१ हजार ६१९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ६२ हजार ३१८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ७ हजार ८५२ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. दरम्यान, आज ५ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून मृताच एकूण आकडा १४४९ इतका आहे.

आज जळगाव शहर- ४३०, जळगाव ग्रामीण-५४, भुसावळ-७३, अमळनेर-१५, चोपडा-९७, पाचोरा-२१, भडगाव-०८, धरणगाव-५०, यावल-३२, एरंडोल-२५, जामनेर-०५, रावेर-२५, पारोळा-१५, चाळीसगाव-९८, मुक्ताईनगर-२०, बोदवड-२६ आणि इतर जिल्ह्यातून १२ असे एकुण ९९२ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जळगावकरांनी लवकरात लवकर नियमांचे पालन करून कोरोनाला अटकाव करणे गरजेचे आहे. अन्यथा पुन्हा एकदा लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. जळगाव शहरात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. मागील काही दिवसापासून शहरात दररोज तीनशेच्या वर रुग्णांची संख्या येत होती. मात्र आज ४०० हून अधिक रुग्ण आढळून आले आहे. शहरात तीन दिवसाचा जनता कॅर्फ्यू लावून देखील कोरोनाला म्हणावे तेवढा रोखण्यात अपयश येत आहे.

जागरूक ग्राहक बना ; जिल्हाधिकारी राऊत यांचे आवाहन

0
world consumer day

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२१ । जागतिक ग्राहक दिनानिमित्ताने मुख्य कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. कोरोना विषाणू प्रादुर्भाव असल्याने सदर कार्यक्रम ऑनलाईन स्वरूपात आयोजित करण्याच्या शासनाच्या सूचना होत्या. त्यानुसार जळगाव जिल्हास्तरीय कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला. 

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी, सहाय्यक पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी उपस्थित होते. तर जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी आणि सदस्य हे ऑनलाईन उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी जागतिक ग्राहक दिनाचे वैशिष्ट्य सांगून ग्राहक ही संकल्पना केवळ स्थानिक नसून वैश्विक असल्याने जगभरात ग्राहक संरक्षण , ग्राहकांचे हक्क अबाधित राखणे, त्याबाबत जनजागृती आणि प्रबोधन करणे सुरू असते, ग्राहक दिनाच्या माध्यमातून याबाबत ग्राहकांना मार्गदर्शन करणेत येत असल्याचे सांगितले. यावर्षी साजरा करण्यात येणाऱ्या जागतिक ग्राहक दिनाचे निमित्ताने ग्राहक संरक्षण कायदा, 2019 बाबत ग्राहकांचे प्रबोधन करण्यासाठी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून त्यांनी सविस्तर माहिती दिली.

ग्राहक आयोगात दाखल करावयाच्या तक्रारीच्या खर्च मर्यादेत झालेली वाढ, ऑनलाईन फसवणूक झाल्यास करता येणारी तक्रार, ऑनलाईन तक्रार दाखल करणे आणि ऑनलाईन सुनावणी याबाबत तपशीलवार माहिती दिली. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 आणि ग्राहक संरक्षण कायदा,2019 यातील महत्वाचे बदल याबाबतही त्यांनी मार्गदर्शनात केले.

या कार्यक्रमात सहाय्यक नियंत्रक, वैध मापनशास्त्र विभाग श्री. जाधव तसेच अन्न  आणि औषध विभागाचे सहा. आयुक्त श्री.यो. को. बेंडकुळे यांनी आपल्या विभागाकडून ग्राहक संरक्षण बाबत करणेत येत असलेल्या बाबींची माहिती दिली.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी या कार्यक्रमात सर्व ग्राहकांना शुभेच्छा देताना जागरूक ग्राहक बनण्याचे आवाहन केले. ग्राहकाच्या अधिकाराची जपणूक झाली पाहिजे, ग्राहक आयोगाची भूमिका यात अत्यंत महत्वाची आहे. ऑनलाइन खरेदीचे वेळी फसवणूक होण्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत. ग्राहकांनी याबाबत अधिक खबरदारी घ्यावी. कुठल्याही ऑनलाइन लिंक वर खात्री करूनच क्लिक करावे, लॉटरी किंवा बक्षीस मिळाल्याचे प्रलोभन दाखवून ग्राहकांना अनोळखी लिंक देऊन जाळ्यात ओढले जाते. कुठलीही बँक ग्राहकांना OTP साठी फोन करत नसते. तेव्हा ग्राहकांनी ऑनलाईन व्यवहार करताना खबरदारी घेणे गरजेचे आहे. प्रसिध्द कंपनीचे नावात किरकोळ बदल करून देखील ग्राहकांना फसवले जाते. अशा स्वरूपाचे फसवे व्यवहार केवळ जागरूक ग्राहकच रोखू शकतात म्हणून ग्राहकाने आता जागरूक ग्राहक होणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन श्री. राऊत यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुमती मनोरे यांनी तर आभार रेखा सावंत यांनी मानले.

माजी कुलगुरू डॉ. सुधीर मेश्राम यांचे निधन

0
dr sudhir meshram passed away

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२१ । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुधीर मेश्राम यांचे आज दुपारी नागपूर येथील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू असतांना निधन झाले. डॉ. सुधीर मेश्राम यांच्या रूपाने एक कर्तबगार व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे. 

डॉ. सुधीर मेश्राम यांनी अमरावती येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मायक्रो-बायोलॉजीत एम.एस्सी. आणि नंतर पीएच.डी. पूर्ण केली. ते नागपुर विद्यापीठातील मायक्रो बायोलॉजी विषयाचे विभागप्रमुख होते. त्यांनी या विषयात सखोल संशोधन केले होते. त्यांचे अनेक रिसर्च पेपर्स आंतराष्ट्रीय पातळीवर प्रसिध्द झाले होते. तर त्यांनी आपल्या संशोधनाचे काही पेटंट सुध्दा मिळविले होते.

यानंतर डॉ. सुधीर मेश्राम हे ८ सप्टेंबर २०११ ते ७ सप्टेंबर २०१६ या कालावधीत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कार्यरत होते.  काळात त्यांनी विद्यापीठात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. यात प्रामुख्याने प्रयोगशाळा ते जमीन हा प्रयोग देश पातळीवर वाखाणण्यात आला होता.

कोर्ट चौकातून व्यावसायिकाची बॅग लांबवली !

0
crime

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२१ । जळगाव शहरातील कोर्ट चौकात कृषक भवन येथे बेकरी असलेल्या व्यावसायिकाची बॅग लांबविल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दौलतनगरातील रहिवासी दिनेशकुमार अर्जुनकुमार ललवाणी वय-३२ यांची पंजाबराव कृषक भवन येथे नटखट नावाने बेकरी आहे. सोमवारी सकाळी ११.१५ वाजता ते बेकारी उघडण्यासाठी पंजाबराव कृषक भवन आले असता त्यांनी स्वतःची मोटार सायकल पार्क करुन जवळ असलेला बॉक्स व एक मरुन रंगाची बॅग घेऊन ते दुकानाजवळ आले. बॉक्स व बॅग दुकानाच्या जवळ मोकळ्या जागी ठेऊन बँगमधून चाबी काढून दुकान उघडले.

तेवढ्यात एक अनोळखी व्यक्ती कॅटबेरी घेण्यासाठी दुकानात आला व तो कॅटबेरी घेऊन रेल्वेस्टेशनकडे निघुन गेला. त्यानंतर ललवाणी हे बॅग घेणेसाठी आले असता त्यांना बॅग आढळून आली नाही. ललवाणी यांनी बॅगचा आजु-बाजूला शोध घेतला असता ती मिळून न आल्याने बॅग चोरी झाल्याची त्यांची खात्री पटली. बॅगेत १५ हजार रोख रक्कम, ६ हजाराचा मोबाईल यासह महत्वाची कागदपत्रे होती. ललवाणी यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस नाईक गणेश पाटील करीत आहे.

शिक्षकांना सुद्धा कोरोना लस देण्यात यावी

0
teachers should also be vaccinated against corona

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२१ । शिक्षकांना कोरोना योद्धा म्हणून कोरोना लस देण्यात यावी,  अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक महानगर आघाडीतर्फे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना करण्यात आली.

कोरोना काळात आघाडीवर असणारे घटक मग ते आरोग्यासाठी असणारे डॉक्टर्स,नर्सेस,स्वच्छता कर्मचारी,पोलीस आदी त्यानंतर हाय रिस्क गटातील नागरिकांना लसीकरण करण्यासाठी प्राधान्य देण्यात आले. त्यानंतर न्यायालयिन कर्मचारी, जजेस, वकिल, पत्रकार यांना प्राधान्य देण्यात आले. पण दुर्दैवाने शिक्षकांना मात्र ही लस देण्यात आली नाही.  लॉक डाऊन काळात शिक्षकांनी शासनाने निर्देशीत केलले सर्व कार्य तत्पतरतेने पार पाडले जसे रेशन दुकानावर ड्युटी, क्वारंटाइन झोन मधील ड्युटी, सर्वेक्षण, महामार्गवरील ड्युटी, शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण अशा अनेक शासनाच्या कामांना शिक्षकांनी तत्परतेने पार पडले आहे.

म्हणून आपण शिक्षकांना सुद्धा लस मिळणेसाठी प्राधान्य द्यावे व  लवकरच जिल्ह्यातील सर्वच शिक्षकांना लस देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील, युवक जिल्हाध्यक्ष स्वप्नील नेमाडे, युवक कार्याध्यक्ष तुषार इंगळे तसेच राष्ट्रवादी शिक्षक महानगर आघाडीतील महानगर अध्यक्ष हेमंत सोनार,कार्याध्यक्ष मनोज भालेराव, उपाध्यक्ष विजय विसपूते,महानगर सचिव श्री.प्रवीण धनगर यांच्या तर्फे  निवेदनातून देण्यात आले.  जिल्हाधिकारी यांनी निवेदन मंजुर करून लवकरच शिक्षकांना लस देण्यात येईल असे याप्रसंगी सांगितले.

सावदा येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरणास सुरवात

0
corona vaccination begins at sawda

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२१ । सावदा परिसरातील असलेल्या ग्रामीण रुग्णालयात सर्वत्र कोरोना प्रतिबंधक लसीकरणास सुरवात झाली आहे.

सावदा शहरात कार्यरत असलेल्या ग्रामीण रुग्णालयात लसीकरण सुरू व्हावे अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत होते. हीच मागणी लक्षात घेता सावदा येथील ग्रामीण रुग्णालयात दि 15 पासून व्हेकसिनेशन सुरू करण्यात आल्याची माहिती येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी बोलतांना दिली यात फ्रंटलाईन वर्कर, जेष्ठ नागरिक, 45 वर्षावरील गंभीर आजार असलेले आदींना येथे लस देण्यात येत आहे, यावेळी परीचारका एच पी भांगाळे, अधीपरिचारिका सी एम कोल्हे, एस, एम, धनगर, एस,आर पाल आदींनी नागरिकांचे लसीकरण केले दरम्यान पहिल्याच दिवशी सुमारे 28 जणांनी दुपारी 2 वाजे पर्यंत लस घेतली.

तर येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना चाचणी देखील दररोज होत असून दि 15 रोजी 50 जणांचे टेस्टिंग झाल्या यात 5 जण पीजेटीव्ह आले रुग्णांना रावेर येथे कोविड सेंटरला पाठविण्यात येत आहे.

दरम्यान पहिल्या दिवशी माजी नगराध्यक्षा ताराबाई गजाननराव वानखेडे यांनी देखील लस घेतली लस घेतल्यावर सदर लस पूर्णपणे सुरक्षित असून शहरातील सर्व जेष्ठ नागरिकांनी ही लस घ्यावी असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

रस्ता लूट करणारा तिसरा संशयीत जेरबंद !

0
crime (1)

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२१ । पिस्तुलाचा धाक दाखवत 15 लाख रुपये असलेली बॅग हिसकावून फरार होणाऱ्या दोन चोरट्यांना बेड्या ठोकण्यात आल्यानंतर आता त्यांच्या तीसऱ्या साथीदारास देखील आज सोमवारी अटक करण्यात आली. अविनाश सुरेश माने ( वय १९, रा. दगडीचाळ, धुळे) असे अटक केलेल्या तीसऱ्या संशयिताचे नाव आहे. या तीघांकडून आत्तापर्यंत २० लाख ६१ हजार रुपयांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली आहे.

1 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील पंचमुखी हनुमान मंदिराजवळ महेश महेश चंद्रमोहन भावसार हे त्यांच्या ताब्यातील मोटार सायकलसह 15 लाख रुपये असलेली बॅग घेऊन जात होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या ताब्यातील बॅग हिसकावत पलायन केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान दोन चोरट्यांची नावे निष्पन्न झाली होती. त्या दोन चोरट्यांच्या शोधात दोन पथके तयार करण्यात आली होती. आरोपींच्या शोधात धुळे, सूरत, पुणे व उल्हासनगर आदी ठिकाणी तपास पथक रवाना करण्यात आले होते. अखेर उल्हासनगर येथे खुशाल उर्फ मनोज अशोक मोकळं व रितीक उर्फ दादु राजेंद्र राजपूत या दोघांना अटक केली होती. तेव्हापासून ते एमआयडीसी पोलिसांच्या पोलीस कोठडीत आहेत.

दरम्यानच्या काळात पोलिसांनी अधिक तपास केला असता या दोघांनी अविनाश माने याच्या मदतीने मालेगाव शहरात देखील अशाच प्रकारे गुन्हे केल्याची कबुली दिली. तसेच भावसार यांच्याकडून लांबवलेल्या पैशांपैकी काही रक्कम माने याच्याकडे ठेवल्याचेही सांगीतले. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी मालेगाव येथे जाऊन माने यालाही ताब्यात घेतले. या तीघांच्या विरुद्ध धुळे, मालेगाव व नाशिक शहरात जबरी लुट, दरोड्यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच आधारावर माने यालाही अटक करुन मालेगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, या तीघांनी आत्तापर्यंत लोकांकडून लुटलेल्या रकमेपैकी २० लाख ६१ हजार रुपयांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली आहे.

या गुन्ह्याच्या तपासकामी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले, एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक विशाल सोनवणे, उप निरीक्षक रामकृष्ण पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, पोलिस नाईक सचिन मुंडे, इमरान सैय्यद, मिलींद सोनवणे, सुधीर साळवे, संदीप पाटील, हेमंत कळसकर, सचिन पाटील यांनी तपासकामी झोकून दिल्याने तपासात यश आले.

एरंडोलच्या प्रौढाचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू

0
erandol

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२१ । एरंडोल शहरातील गांधीपुरामधील प्रौढाचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुरेश सखाराम कुदाळे (वय-४३) असे मृत तरुणाचे नाव असून याबाबत  एरंडोल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सुरेश कुदाळे हे गेल्या अनेक दिवसांपासून दारूचे व्यसन होते. १४ मार्च रोजी सायंकाळी दारूच्या नशेत असतांना नदीच्या पाण्यात पडले, त्यात त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सुरेश कुदाळे यांना दारू पिण्याची प्रचंड सवय होती. त्यात दारूच्या नशेत आत्महत्या केली असावी असा अंदाज नातेवाईकांनी केला आहे.

याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक अनिल पाटील हे करीत आहे.

संचारबंदीचे उल्लंघन ; चाळीसगावात बँड जप्त करत सात जणांवर गुन्हे दाखल

0

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२१ । चाळीसगाव शहरात संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी मोरया बॅंड जप्त करत सात जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले. 

चाळीसगाव शहरात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. शहरात  १३ व १४ मार्च रोजी संचारबंदीचे आदेश लागू केली आहे. या दरम्यान,  शहरातील भडगाव रोड परिसरातील स्वयंवर मंगल कार्यालयासमोर रात्री ११ वाजेच्या सुमारास चक्क मोरया बॅंड (गडखांब ता. अमळनेर) सुरू होता. पोलिसांच्या पेट्रोलिंग दरम्यान ही बाब लक्षात येताच मोरया बॅंड ताब्यात घेत सात जणांवर शहर पोलिस ठाण्यात उशिराने गुन्हा दाखल करण्यात आले.

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हि कारवाई करण्यात आली. सरकारी नियमानुसार संदीप ईश्वर पाटील यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास शैलेंद्र पाटील हे करीत आहेत.