⁠ 
शुक्रवार, डिसेंबर 13, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | जागरूक ग्राहक बना ; जिल्हाधिकारी राऊत यांचे आवाहन

जागरूक ग्राहक बना ; जिल्हाधिकारी राऊत यांचे आवाहन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२१ । जागतिक ग्राहक दिनानिमित्ताने मुख्य कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. कोरोना विषाणू प्रादुर्भाव असल्याने सदर कार्यक्रम ऑनलाईन स्वरूपात आयोजित करण्याच्या शासनाच्या सूचना होत्या. त्यानुसार जळगाव जिल्हास्तरीय कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला. 

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी, सहाय्यक पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी उपस्थित होते. तर जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी आणि सदस्य हे ऑनलाईन उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी जागतिक ग्राहक दिनाचे वैशिष्ट्य सांगून ग्राहक ही संकल्पना केवळ स्थानिक नसून वैश्विक असल्याने जगभरात ग्राहक संरक्षण , ग्राहकांचे हक्क अबाधित राखणे, त्याबाबत जनजागृती आणि प्रबोधन करणे सुरू असते, ग्राहक दिनाच्या माध्यमातून याबाबत ग्राहकांना मार्गदर्शन करणेत येत असल्याचे सांगितले. यावर्षी साजरा करण्यात येणाऱ्या जागतिक ग्राहक दिनाचे निमित्ताने ग्राहक संरक्षण कायदा, 2019 बाबत ग्राहकांचे प्रबोधन करण्यासाठी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून त्यांनी सविस्तर माहिती दिली.

ग्राहक आयोगात दाखल करावयाच्या तक्रारीच्या खर्च मर्यादेत झालेली वाढ, ऑनलाईन फसवणूक झाल्यास करता येणारी तक्रार, ऑनलाईन तक्रार दाखल करणे आणि ऑनलाईन सुनावणी याबाबत तपशीलवार माहिती दिली. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 आणि ग्राहक संरक्षण कायदा,2019 यातील महत्वाचे बदल याबाबतही त्यांनी मार्गदर्शनात केले.

या कार्यक्रमात सहाय्यक नियंत्रक, वैध मापनशास्त्र विभाग श्री. जाधव तसेच अन्न  आणि औषध विभागाचे सहा. आयुक्त श्री.यो. को. बेंडकुळे यांनी आपल्या विभागाकडून ग्राहक संरक्षण बाबत करणेत येत असलेल्या बाबींची माहिती दिली.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी या कार्यक्रमात सर्व ग्राहकांना शुभेच्छा देताना जागरूक ग्राहक बनण्याचे आवाहन केले. ग्राहकाच्या अधिकाराची जपणूक झाली पाहिजे, ग्राहक आयोगाची भूमिका यात अत्यंत महत्वाची आहे. ऑनलाइन खरेदीचे वेळी फसवणूक होण्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत. ग्राहकांनी याबाबत अधिक खबरदारी घ्यावी. कुठल्याही ऑनलाइन लिंक वर खात्री करूनच क्लिक करावे, लॉटरी किंवा बक्षीस मिळाल्याचे प्रलोभन दाखवून ग्राहकांना अनोळखी लिंक देऊन जाळ्यात ओढले जाते. कुठलीही बँक ग्राहकांना OTP साठी फोन करत नसते. तेव्हा ग्राहकांनी ऑनलाईन व्यवहार करताना खबरदारी घेणे गरजेचे आहे. प्रसिध्द कंपनीचे नावात किरकोळ बदल करून देखील ग्राहकांना फसवले जाते. अशा स्वरूपाचे फसवे व्यवहार केवळ जागरूक ग्राहकच रोखू शकतात म्हणून ग्राहकाने आता जागरूक ग्राहक होणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन श्री. राऊत यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुमती मनोरे यांनी तर आभार रेखा सावंत यांनी मानले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.