⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024

नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा 16 मे रोजी

0
exam

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२१ । केंद्र सरकार संचालित जवाहर नवोदय विद्यालय साकेगाव (भुसावळ) जिल्हा जळगाव येथील इयत्ता 6 वी च्या सन 2021-22 प्रवेशा करीता होणारी निवड चाचणी परीक्षा 10 एप्रिल ऐवजी 16 मे 2021 रोजी आयोजित करण्यात आली आहे. 

प्रशासकीय कारणामुळे परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.  सर्व संबधीत मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, अध्यापक, पालक व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. परीक्षेचे प्रवेश पत्र त्याच वेबसाईट navodaya.gov.in या संकेतस्थळावरून डाउनलोड करुन घ्यावे. अधीक माहितीसाठी 9404900916 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.आर. खंडारे यांनी केले आहे.

अत्यावश्यक सेवा वगळता एरंडोल येथे बंदला चांगला प्रतिसाद

0
janta carfew erandol

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२१ । वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर एरंडोल शहरातील बंदला बुधवारी चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

यादरम्यान, दवाखाने,मेडिकल, दुध डेअरी, बँका, शासकीय निमशासकीय कार्यालये इत्यादी सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्यात आला. मात्र एका कापड दुकानदाराने मागच्या दरवाज्यातून सकाळी काहीवेळ कापड व लग्नाचा बस्ता विक्री केल्याची जोरदार चर्चा आहे.

मेन रोड च्या मुख्य बाजापेठेत दवाखाने,मेडिकल व दुध डेअरी, बँक, शासकीय निमशासकीय कार्यालये या सेवा सुरु होत्या.मात्र इतर दुकाने बंद आढळून आली. फुले आंबेडकर व्यापारी संकुल,म्हसावद नाक्यावरील व्यापारी संकुल,छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल, शेतकी संघ व्यापारी संकुल याठिकाणी शुकशुकाट आढळून आला.दरम्यान बुधवार दरवाजा जवळ नागरिकांच्या अँटी जन टेस्ट घेण्यात आल्या.

कोरोना काळातील लोकसंघर्ष मोर्चाचे कार्य अत्यंत कौतुकास्पद : जिल्हाधिकारी राऊत

0
abhijit raut

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२१ कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वसामान्य माणसांच्या सोबत मागील वर्षभरापासून भक्कमपणे उभ्या असलेल्या लोकसंघर्ष मोर्चाचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी असून आकस्मिक परिस्थितीत माणुसकीची शिकवण देणारे आहे असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढले. 

लोकसंघर्ष मोर्चाने सुरु केलेल्या कोविड केअर सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी आपल्या भावना अनौपचारिकपणे व्यक्त केल्या. यावेळी  जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, महानगर पालिकेचे आयुक्त प्रदीप कुलकर्णी, लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे, माजी उपमहापौर करीम सालार, डॉ. स्नेहल फेगडे, अब्दुल गफ्फार मलिक, डॉ. क्षितिज पवार, डॉ. घोलप इत्यादी मान्यवर उपस्थित होते. पैशांअभावी कुणीही आरोग्यव्यवस्थेपासून वंचित राहू नये यासाठी लोकसंघर्ष मोर्चाने बुधवारपासून शासकीय तंत्रनिकेतन मध्ये कोविड  केअर सेंटर सुरु केले आहे. याप्रसंगी अनेक कोविड रुग्णांना निःशुल्क प्रवेश देण्यात आला.

नागरिकांनी जनता कर्फ्यू ला प्रतिसाद दिल्याबद्दल अभिजित राऊत यांनी जनतेचे आभार मानले. सामाजिक संस्थांच्या पुढाकारामुळे शासन यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होते. त्यामुळे शासकीय मोफत आरोग्य विषयक सेवा सुविधा तसेच सेवाभावी संस्था द्वारे पुरवल्या जाणाऱ्या मोफत आरोग्य विषयक सेवा सुविधा या दोन्ही ठिकाणी रुग्णांना चांगली सेवा मिळते. शासन आपल्या बाजूने पूर्ण प्रयत्न करत आहे पण जोपर्यंत सामाजिक सेवाभावी संघटना आणि नागरिक पूर्ण सहकार्य करत नाहीत तोपर्यंत आपल्याला पूर्ण यश मिळणार नाही. नागरिकांनी असेच नियमांचे पालन केल्यास पुन्हा लॉकडाऊन ची गरज भासणार नाही, असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. मागील वर्षभराच्या कठीण काळामध्ये अन्नदानापासून तर रुग्णसेवेपर्यंत विविध भूमिकांमध्ये प्रतिभाताई शिंदे यांच्या नेतृत्वात लोकसंघर्ष मोर्चाचे कार्यकर्ते झटत असल्याबद्दल मनापासून कौतुक केले.

कोरोना केअर सेंटर सुरू केल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी प्रतिभा शिंदे व कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन केले.  काही लक्षणे दिसत असतील, वय जास्त असेल तर स्वतः कोरोना केअर सेंटर मध्ये दाखल होण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. जेणेकरून योग्य त्या उपचार सुविधा मिळवून कोरोना चा संसर्ग आणि आरोग्याला होणारा धोका टळू शकेल. कोरोना केअर सेंटरचा लाभ घेऊन आपल्या आणि सर्वांच्या आरोग्याचे रक्षण करावे, सर्व नागरिकांनी जबाबदारीने नियमांचे पालन केल्यास पोलीस कारवाईची वेळ येणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले.

कोरोना च्या पहिल्या लाटेतही प्रशासन, लोक संघटना आणि संस्थांनी मिळून कोरोनाशी लढा दिला. पहिल्या लाटेच्या वेळीदेखील बहिणाबाई केअर सेंटर हे जनतेच्या सेवेसाठी नि:शुल्क उपलब्ध असल्याची माहिती लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा ताई शिंदे यांनी यावेळी दिली. लोकसंघर्ष मोर्चा कोविड केअर सेंटर जनतेच्या सेवेसाठी मोफत उपलब्ध असून अनेक लोकांच्या व दात्यांच्या सहकार्याने ते आम्ही सुरू करू शकलो आहोत  असे सांगताना त्यांनी सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. हे काम आम्ही प्रशासनाच्या सोबत मिळूनच करू इच्छितो असेही त्या म्हणाल्या. जेव्हा गरज पडेल तेव्हा संघर्ष करू पण, जेव्हा गरज पडेल तेव्हा निर्माण आणि रचनात्मक कार्य करण्यासाठी देखील आम्ही सरकार सोबत उभे राहू असे त्यांनी सांगितले. लोकसंघर्ष मोर्चा ने सुरू केलेल्या या कार्यात लोक मदत करतील व  जबाबदारीने सहभागही घेतील आणि लवकरच जळगाव शहर हे कोरोना मुक्त होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सर्वसामान्य गरीब गरजू रुग्णांसाठी प्रतिभाताई शिंदे यांनी कोविड केअर सेंटर सुरु करून आरोग्यसेवेमध्ये हातभार लावत असल्याबद्दल आयुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी लोकसंघर्ष मोर्चाविषयी कृतज्ञता व्यक्त केली व अभिनंदन केले.

पहिल्या टप्प्यातील कोरोनाकाळातही लोकसंघर्ष मोर्चाने मनोभावे रुग्णसेवा केली होती. हाच अनुभव गाठीशी घेऊन प्रतिभा शिंदे यांनी शासकीय तंत्र निकेतनमध्ये पुन्हा लोकसंघर्ष मोर्चा कोविड  केअर सेंटर सुरु केले आहे. या कोव्हीड सेंटरमध्ये १२५ बेडची व्यवस्था असून रुग्णाच्या राहण्याची व्यवस्था, आरोग्यव्यवस्था, प्रोटीनयुक्त नाश्ता, चहा, भोजन तसेच आवश्यकत्यानुसार रुग्णवाहिका इत्यादी सेवा लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कोरोनाची दुसरी लाट आली असून मोठ्या प्रमाणात जळगाव जिल्हा व शहरामध्ये रुग्ण आढळून येत आहे. जगण्याचा व  आरोग्य सेवा प्राप्त करण्याचा अधिकार सर्वांनाच असला तरी सर्वसामान्य नागरिक, गरीब व गरजू लोकांना पैशांअभावी सहजतेने बेड उपलब्ध होत नाहीत. अशा सर्वांसाठी लोकसंघर्ष  मोर्चाचे कोव्हीड केअर सेंटर हक्काचे व विश्वासाचे ठिकाण म्हणून उपलब्ध होत आहे. आजारपणाच्या काळात घरापासून लांब राहताना रुग्णाला आरोग्यविषयक कोणतीही कमतरता भासू नये याची पुरेपूर काळजी लोकसंघर्ष व्यवस्थापनाने घेतली आहे. प्रतिभाताई शिंदे यांच्या नेतृत्वात सचिन धांडे, विजय देसाई, योगेश पाटील, भारत कर्डीले, प्रमोद पाटील, दामोदर भारंबे, कैलास मोरे, उर्मिला पाटील आदी कार्यकर्ते कोरोना योद्धा बनून अथक परिश्रम घेत आहेत.

जळगाव कोरोना अपडेट्स : आज जिल्ह्यात ९९६ कोरोना पॉझिटिव्ह

0
corona-updates

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्यातील कोरोना तांडव दिवसेंदिवस वाढत आहे. आज जिल्ह्यात तब्बल ९९६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. रोजप्रमाणे आजदेखील जळगाव शहरातून सर्वाधिक २१७ नवीन कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. 

आज जळगाव शहर- २१७, जळगाव ग्रामीण-३, भुसावळ-४२, अमळनेर-९१, चोपडा-१८१, पाचोरा-६५, भडगाव-१९, धरणगाव-७८, यावल-४०, एरंडोल-५५, जामनेर-६०, रावेर-२१, पारोळा-२८, चाळीसगाव-५९, मुक्ताईनगर-२३, बोदवड-११ आणि इतर जिल्ह्यातून ३ असे एकुण९९६ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जवखेडे खुर्द येथील अंगणवाडी मदतनीसचा कोरोनामुळे मृत्यू

0
anganwadi helper dies due to corona

 

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२१ । एरंडोल तालुक्यातील जवखेडे खुर्द येथील रहिवाशी अंगणवाडी मदतनीस कल्पना विजयसिंग पाटील (वय ५६) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

कल्पना बाई विजय सिंग पाटील यांचा रॅपिड अँटीजीन टेस्टचा अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र ऑक्सिजन लेव्हल कमी असल्यामुळे त्यांना अमळनेर येथील डॉ.अनिल शिंदे यांच्या नर्मदा फाऊंडेशन यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सिटी स्कॅन अहवालात त्यांना ८० टक्के निमोनिया असल्याचे निदर्शनास आले. दि.७ मार्च २०२१ रविवार रोजी त्यांचा R.T.P.C.R. चा अहवाल पॉ झी टिव्ह आला होता.मंगळवार दि.९ मार्च २०२१ रोजी ९ वाजेला त्यांचा कोरोना मुळे मृत्यू झाला.

त्या जवखेडे खुर्द येथे अंगणवाडी मदतनीस म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगी,जावई व नातवंडे असा परिवार आहे.

चाळीसगाव तालुक्यातील एक कोटी रुपायांच्या रस्त्यांच्या कामाला सुरुवात

0
chalisagaon

जळगाव  लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२१ । तालुक्यातील 8 गावांना जोडणाऱ्या जिल्हा परिषद 30/54 बजेट मधून जवळपास एक कोटी रुपायांच्या रस्त्यांच्या कामाला मंजुरी मिळून सुरुवात झाली असून ही कामे मार्च अखेर पूर्ण झाली पाहिजे होती. मात्र आत्ताच कामांना सुरुवात झाल्याने मुदतीत कामे होत नसल्याने जि प च्या कामकाजावर प्रशचिन्ह निर्माण झाले आहे.

शिवाय पिंपरखेड तांडा येथे 14 वा वित्त आयोगाचे काम आमदार निधीचे दाखवून कामात अफरातफर करणाऱ्या शाखा अभियंता व ठेकेदार यांची चौकशी होऊन कारवाई होत नसल्याने जि प बांधकाम विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

चाळीसगाव तालुक्यातील भवाळी ते डस्केबर्डी (30 लाख), चिंचगव्हाण ते दहिवद (20 लाख), करजगाव ते शिंदी (30 लाख), देवळी ते पिंप्री (20 लाख) असे एकूण जवळपास एक कोटी रुपयांचे खडीकरण व डांबरीकरण रस्त्याचे काम मंजूर असून ही कामे मंजूर असताना चाळीसगाव जि प बांधकाम विभागाला अद्याप वर्क ऑर्डर व इस्टीमेट देखील प्राप्त नाही शिवाय ही कामे मार्च अखेर पूर्ण करावयाची असताना आता फक्त काही रस्त्यांवर खडी टाकली आहे तर काही ठिकाणी खडी पसरवणे सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मार्च महिना संपायला फक्त काही दिवस शिल्लक असतांना मुदतीत ही काही होतील का ? असा सवाल उपस्थित होऊन जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

दरम्यान तालुक्यातील पिंपरखेड तांडा येथे मागील वर्षी पेव्हर ब्लॉक कामात घोटाळा झाला होता राम मंदिराच्या जवळ आमदार निधीचे 2 लाख 96 हजाराचे व त्याच जागेवर 14 वा वित्त आयोगाचे काम मंजूर होते शाखा अभियंता व ठेकेदाराने आमदार निधीचे काम न करता 14 वा वित्त आयोगाचे काम दाखवून पूर्ण निधी हडप केला होता याबाबत तक्रार झाल्यावर संबंधित शाखा अभियंता यांच्यावर ठपका ठेवून चौकशी देखील झाली होती तेव्हा ठेकेदार व शाखा अभियंता यांनी शेजारीच थोडेफार काम करून झालेला प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला होता याबाबत चौकशी होऊन अद्याप शाखा अभियंता व ठेकेदार यांच्यावर काहीच कारवाई न झाल्याने देखील आश्चर्य व्यक्त होत आहे.

स्थानिक तरुणांच्या मदतीने लसीकरण रजिस्ट्रेशन समस्या सोडवली

0
vaccination registration problem solved with the help of youth

जळगाव  लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२१ । प्राथमिक आरोग्य केंद्र धानोरा येथे सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्राला  नेटवर्क समस्या मुळे खूप वेळ लागत असल्याने तक्रारी वाढल्या. तांत्रिक अडचणी मुळे वयोवृद्ध नागरिकांना ताटकळत बसावे लागत होते. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप लासुरकर, पं स सदस्या कल्पनाताई पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ उमेश कवडीवाले, पोलीस पाटील दिनेश पाटील यांनी समस्येवर चर्चा करून स्थानिक युवा स्वयंसेवक चंद्रशेखर दिनकर चौधरी, उद्धव महेश महाजन, प्रीतम प्रदीप महाजन, प्रसाद विकास महाजन, एस टी महाजन सर, देविदास महाजन सर यांच्या लॅपटॉप वरून लसीकरण नोंदणी/रजिस्ट्रेशन करण्यास मदत सुरू केली. परिणामस्वरूप लसीकरण लवकर होऊ लागले. आरोग्य कर्मचारी व नागरिकांनी सर्व स्वयंसेवकांचे अभिनंदन केले.

प्रार्थमिक आरोग्य केंद्र धानोरा डॉ उमेश कवडीवाला सह सर्व स्टॉफ मेहनत घेत आहेत. भिकुबाई बोदडे कुशलतेने लस देत आहेत. रजिस्ट्रेशन राहुल सोनवणे, भारती सोनवणे,एलिझा मोरे हे करीत आहेत. त्यांना व्ही टी महाजन,एम डी माळी, विलास पवार,औषधी निर्माता मोनाली पाटील, दिपा महाजन,नितीन महाजन, खान, प्रवीण पाटील ,आशा वर्कर प्रमुख करुणा चौधरी व सर्व आशा वर्कर मदत करीत आहेत.

वय वर्ष 60 पेक्षा जास्त वय असलेल्या स्री/पुरुषांनी लवकर पहिली लस घ्यावी.दुसरी लस पहिली लस घेतल्यानंतर 28 दिवसांनी आपण घ्यायची आहे. जातांना सोबत आधारकार्ड झेरॉक्स त्यावर आपला मोबाइल नंबर लीहुन द्यावा.काहींना आधार कार्ड लिंक करतांना अडचण येत असते म्हणून सोबत मतदान कार्ड असू द्यावे.

ज्यांचे वय 45 ते 60 वर्षातील आहे अशा स्री/पुरुषांपैकी एखाद्या आजाराचे ट्रीटमेंट घेत असलेली व्यक्ती लस घेऊ शकतात. अशा लोकांनी आधारकार्ड सोबत डॉक्टरांचा अर्ज (फॅमिली डॉक्टरां कडून सही शिक्का मारलेला अर्ज.) जोडावा.   लवकर लसीकरण करून घ्यावे. तोंडाला नियमित मास्क वापरावा.

सौ.जयश्री सुनील महाजन, महापौर जळगाव मनपा ‘नेमप्लेट’ तयार!

0
jayashri sunil mahajan
नेम प्लेट तयार करतांना संजू आर्ट्सचे संचालक संजू चव्हाण

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२१ । शहर मनपाच्या महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री सुनील महाजन या विराजमान होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. जयश्री महाजन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून ‘सौ.जयश्री सुनील महाजन, महापौर, जळगाव महानगरपालिका’ नावाने घराला लावण्याची आकर्षक नेम प्लेट देखील तयार करण्यात आली आहे.

जळगाव मनपातील राजकारण पूर्णतः ढवळून निघाले असून शिवसेनेने मनपावर भगवा फडकविण्याचे निश्चित केले आहे. भाजपातून फोडलेल्या नगरसेवकांच्या बळावर शिवसेनेकडून महापौर पदासाठी जयश्री सुनील महाजन तर उपमहापौर पदासाठी कुलभूषण पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेकडून विजयाची जय्यत तयारी केली जात आहे. जळगाव शहरातील संजू आर्ट्सचे संचालक संजू चव्हाण यांनी भावी महापौर सौ.जयश्री महाजन यांना भेट देण्यासाठी एक आकर्षक नेम प्लेट देखील तयार केली आहे. जयश्री महाजन यांचा विजय निश्चित मानला जात असल्याने शिवसेनेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भाजपच्या नगरसेविका ज्योती चव्हाण बेपत्ता ; पतीच्या तक्रारीनंतर खळबळ

0
bjp corporator jyoti chavan goes missing

जळगाव  लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२१ । जळगाव मनपाच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीला अवघे काही तास राहिले असतानाच भाजपच्या नगरसेविका सौ. ज्योती बाळासाहेब चव्हाण हे बेपत्ता झाल्याची तक्रार पती बाळासाहेब चव्हाण यांनी दाखल केल्यानंतर खळबळ उडाली आहे.

जळगाव महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक उद्या १८ मार्चला पार पडणार आहे.  निवडणुकीआधीच भाजपमध्ये पडलेल्या फुटी मुळे निवडणूक चुरशीची झाली आहे. दरम्यान, भाजप आणि भाजपमधील फुटीर नगरसेवकांचा गट हा अज्ञात ठिकाणी असून उद्या पार पडणाऱ्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी ऑनलाईन सभा घेतली जाणार आहे. त्यामुळे अज्ञात ठिकाणी राहून सुध्दा मतदान करता येणार असल्याने दोन्ही बाजूंनी ही काळजी घेतली आहे. दरम्यान, यात आता अनेक नाट्यमय घटना घडत आहेत. यात आता भाजपच्या नगरसेविका ज्योती चव्हाण बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांचे पती बाळासाहेब चव्हाण यांनी रामानंदनगर पोलीस स्थानकात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

या फिर्यादीत म्हटले आहे की, सौ. ज्योती बाळासाहेब चव्हाण या काही नगरसेविकांसोबत दिनांक १४ मार्च रोजी रात्री नाशिक येथे रवाना झाल्या. यानंतर १५ मार्च रोजी दुपारी चार वाजता एका नगरसेविकेच्या मोबाईलवरून त्यांनी आपल्या कुटुंबाशी शेवटचा संपर्क साधला. यानंतर त्यांनी कुटुंबाशी संपर्क साधला नसल्यामुळे रामानंदनगर पोलीस स्थानकात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.दरम्यान, प्रस्तुत प्रतिनिधीने याबाबत फिर्यादी बाळासाहेब चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण रामानंदनगर पोलीस स्थानकात मिसींगची फिर्याद दिल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. तसेच आता ते नाशिकच्या दिशेने निघाले असून पारोळ्यापर्यंत पोहचले असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.