⁠ 
गुरूवार, मे 9, 2024

कोरोना काळातील लोकसंघर्ष मोर्चाचे कार्य अत्यंत कौतुकास्पद : जिल्हाधिकारी राऊत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२१ कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वसामान्य माणसांच्या सोबत मागील वर्षभरापासून भक्कमपणे उभ्या असलेल्या लोकसंघर्ष मोर्चाचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी असून आकस्मिक परिस्थितीत माणुसकीची शिकवण देणारे आहे असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढले. 

लोकसंघर्ष मोर्चाने सुरु केलेल्या कोविड केअर सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी आपल्या भावना अनौपचारिकपणे व्यक्त केल्या. यावेळी  जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, महानगर पालिकेचे आयुक्त प्रदीप कुलकर्णी, लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे, माजी उपमहापौर करीम सालार, डॉ. स्नेहल फेगडे, अब्दुल गफ्फार मलिक, डॉ. क्षितिज पवार, डॉ. घोलप इत्यादी मान्यवर उपस्थित होते. पैशांअभावी कुणीही आरोग्यव्यवस्थेपासून वंचित राहू नये यासाठी लोकसंघर्ष मोर्चाने बुधवारपासून शासकीय तंत्रनिकेतन मध्ये कोविड  केअर सेंटर सुरु केले आहे. याप्रसंगी अनेक कोविड रुग्णांना निःशुल्क प्रवेश देण्यात आला.

नागरिकांनी जनता कर्फ्यू ला प्रतिसाद दिल्याबद्दल अभिजित राऊत यांनी जनतेचे आभार मानले. सामाजिक संस्थांच्या पुढाकारामुळे शासन यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होते. त्यामुळे शासकीय मोफत आरोग्य विषयक सेवा सुविधा तसेच सेवाभावी संस्था द्वारे पुरवल्या जाणाऱ्या मोफत आरोग्य विषयक सेवा सुविधा या दोन्ही ठिकाणी रुग्णांना चांगली सेवा मिळते. शासन आपल्या बाजूने पूर्ण प्रयत्न करत आहे पण जोपर्यंत सामाजिक सेवाभावी संघटना आणि नागरिक पूर्ण सहकार्य करत नाहीत तोपर्यंत आपल्याला पूर्ण यश मिळणार नाही. नागरिकांनी असेच नियमांचे पालन केल्यास पुन्हा लॉकडाऊन ची गरज भासणार नाही, असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. मागील वर्षभराच्या कठीण काळामध्ये अन्नदानापासून तर रुग्णसेवेपर्यंत विविध भूमिकांमध्ये प्रतिभाताई शिंदे यांच्या नेतृत्वात लोकसंघर्ष मोर्चाचे कार्यकर्ते झटत असल्याबद्दल मनापासून कौतुक केले.

कोरोना केअर सेंटर सुरू केल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी प्रतिभा शिंदे व कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन केले.  काही लक्षणे दिसत असतील, वय जास्त असेल तर स्वतः कोरोना केअर सेंटर मध्ये दाखल होण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. जेणेकरून योग्य त्या उपचार सुविधा मिळवून कोरोना चा संसर्ग आणि आरोग्याला होणारा धोका टळू शकेल. कोरोना केअर सेंटरचा लाभ घेऊन आपल्या आणि सर्वांच्या आरोग्याचे रक्षण करावे, सर्व नागरिकांनी जबाबदारीने नियमांचे पालन केल्यास पोलीस कारवाईची वेळ येणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले.

कोरोना च्या पहिल्या लाटेतही प्रशासन, लोक संघटना आणि संस्थांनी मिळून कोरोनाशी लढा दिला. पहिल्या लाटेच्या वेळीदेखील बहिणाबाई केअर सेंटर हे जनतेच्या सेवेसाठी नि:शुल्क उपलब्ध असल्याची माहिती लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा ताई शिंदे यांनी यावेळी दिली. लोकसंघर्ष मोर्चा कोविड केअर सेंटर जनतेच्या सेवेसाठी मोफत उपलब्ध असून अनेक लोकांच्या व दात्यांच्या सहकार्याने ते आम्ही सुरू करू शकलो आहोत  असे सांगताना त्यांनी सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. हे काम आम्ही प्रशासनाच्या सोबत मिळूनच करू इच्छितो असेही त्या म्हणाल्या. जेव्हा गरज पडेल तेव्हा संघर्ष करू पण, जेव्हा गरज पडेल तेव्हा निर्माण आणि रचनात्मक कार्य करण्यासाठी देखील आम्ही सरकार सोबत उभे राहू असे त्यांनी सांगितले. लोकसंघर्ष मोर्चा ने सुरू केलेल्या या कार्यात लोक मदत करतील व  जबाबदारीने सहभागही घेतील आणि लवकरच जळगाव शहर हे कोरोना मुक्त होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सर्वसामान्य गरीब गरजू रुग्णांसाठी प्रतिभाताई शिंदे यांनी कोविड केअर सेंटर सुरु करून आरोग्यसेवेमध्ये हातभार लावत असल्याबद्दल आयुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी लोकसंघर्ष मोर्चाविषयी कृतज्ञता व्यक्त केली व अभिनंदन केले.

पहिल्या टप्प्यातील कोरोनाकाळातही लोकसंघर्ष मोर्चाने मनोभावे रुग्णसेवा केली होती. हाच अनुभव गाठीशी घेऊन प्रतिभा शिंदे यांनी शासकीय तंत्र निकेतनमध्ये पुन्हा लोकसंघर्ष मोर्चा कोविड  केअर सेंटर सुरु केले आहे. या कोव्हीड सेंटरमध्ये १२५ बेडची व्यवस्था असून रुग्णाच्या राहण्याची व्यवस्था, आरोग्यव्यवस्था, प्रोटीनयुक्त नाश्ता, चहा, भोजन तसेच आवश्यकत्यानुसार रुग्णवाहिका इत्यादी सेवा लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कोरोनाची दुसरी लाट आली असून मोठ्या प्रमाणात जळगाव जिल्हा व शहरामध्ये रुग्ण आढळून येत आहे. जगण्याचा व  आरोग्य सेवा प्राप्त करण्याचा अधिकार सर्वांनाच असला तरी सर्वसामान्य नागरिक, गरीब व गरजू लोकांना पैशांअभावी सहजतेने बेड उपलब्ध होत नाहीत. अशा सर्वांसाठी लोकसंघर्ष  मोर्चाचे कोव्हीड केअर सेंटर हक्काचे व विश्वासाचे ठिकाण म्हणून उपलब्ध होत आहे. आजारपणाच्या काळात घरापासून लांब राहताना रुग्णाला आरोग्यविषयक कोणतीही कमतरता भासू नये याची पुरेपूर काळजी लोकसंघर्ष व्यवस्थापनाने घेतली आहे. प्रतिभाताई शिंदे यांच्या नेतृत्वात सचिन धांडे, विजय देसाई, योगेश पाटील, भारत कर्डीले, प्रमोद पाटील, दामोदर भारंबे, कैलास मोरे, उर्मिला पाटील आदी कार्यकर्ते कोरोना योद्धा बनून अथक परिश्रम घेत आहेत.