⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 15, 2024

माय-बाप झाले वैरी, निर्दयतेने घेतला मुलीचा जीव?

0
jalgaon crime

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२१ । शहरात मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली असून आई-बाप आणि मुलीच्या नात्याला हदरवणारा प्रकार समोर आला आहे. पिंप्राळा परिसरात भाड्याने राहत असलेल्या एका दाम्पत्याने मुलगी नको म्हणून आपल्याच १२ वर्षीय मुलीचा निर्दयतेने जीव घेतला आहे. मुलीच्या आजोबांना प्रकार कळल्यानंतर सर्व घटनाक्रम समोर आला आहे. मुलीला खाणे-पिणे न देणे, बांधून ठेवत खोलीत डांबून ठेवल्याने मुलीचा जीव गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

whatsapp image 2021 04 29 at 8.47.21 am

शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात भाड्याने राहणाऱ्या जावीद शेख हा वैद्यकीय वस्तू विक्री प्रतिनिधी म्हणून काम करतो. जावीद व त्यांची पत्नी नजिया परवीनबी यांना तीन मुली आहेत.

मुलीला समजत होता अपशकुनी

मोठी मुलगी कनीज जन्मली तेव्हा जावीद याच्या आईचा मृत्यू झाला. त्यानंतर २ वर्षात त्याचे मेडिकल जळाले. त्यामुळे ती मुलगी आपल्यासाठी दुर्भाग्य असल्याचे तो समजू लागला आणि तिचा छळ करू लागला. कनीजचे बाबा(आईचे वडील) यांना हा प्रकार समजल्याने ते तिला आपल्या घरी अमळनेर येथे घेऊन गेले. मुलगी ९ वर्षाची झाल्यावर जावीद याने काही मध्यस्थीच्या मदतीने तिला जळगावी घरी घेऊन आला.

मुलीचा मृत्यू आणि रातोरात दफनविधी

दि.२३ रोजी रात्री कनीजचा मृत्यू झाल्यानंतर कोणत्याही नातेवाईकांना न कळविता रातोरात तिचा दफनविधी करण्यात आला. जावीदने पिंप्राळा येथील कब्रस्थानमध्ये पावती देखील फाडली नाही. दुसऱ्याच दिवशी त्याने पत्नी आणि दोन मुलींसह जळगाव सोडून धुळे गाठले.

दोन दिवसांनी प्रकार उघड

मुलीच्या मामाला तीन दिवसांनी अमळनेर येथे एका बाहेरील व्यक्तीने येऊन सांगितले की, तुमच्या भाचीचा मृत्यू झाला आहे. मामाने हा प्रकार घरी कळवला असता मुलीच्या मोठ्या काकांकडून त्यांना याबाबत खात्री झाली. त्यामुळे त्यांनी जळगावातील इतर नातेवाईकांना घरी पाठवून खात्री केली असता जावीद घर बंद करून निघून गेला असल्याचे समजले.

मुलीचा छळ करीत घेतला जीव

लहानपणापासून नकोशी असलेल्या कनीज हिला घरातच एका खोलीत कोंडून ठेवले होते. अन्न, पाण्याविना तिचा जीव घेण्यासाठी तिला खायला, प्यायला देऊ नको असा दम जावीदने पत्नीला दिला होता. कनीजला खाण्यापिण्यासाठी न देता तिला बांधून ठेवलेले होते. गेल्या अनेक दिवसापासून हा प्रकार सुरू होता आणि त्यातच शरीर कमकुवत होऊन दि.२३ रोजी तिचा मृत्यू झाल्याची माहिती मुलीच्या आजोबांना समजली आहे. दरम्यान, पोलीस तपासात जावीद व नजिया यांनी देखील पोलिसांना योग्य उत्तरे दिली नाही. दोघांच्या उत्तरात तफावत आढळून आली.

व्हिसेरा राखीव, रामानंद नगर पोलिसात गुन्हा

दरम्यान, संपूर्ण घटनाक्रम विचित्र असल्याने रामानंद नगर पोलिसांनी मयतेच्या आई-वडिलांना बोलावून घेतले. दोघांची उत्तरे समर्पक न वाटल्याने कब्रस्थानमध्ये जाऊन तहसीलदार आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या उपस्थित मृतदेह बाहेर काढण्यात आला. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून व्हिसेरा राखीव ठेवण्यात आला. त्यानंतर पुन्हा दफनविधी पार पडला. गेल्या तीन दिवसांपासून पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा हे याप्रकरणात लक्ष घालून होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बिरारी यांनी सरकारकडून फिर्याद दिली असून गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी जावीदला अटक केली असून रजियाला महिला निरीक्षणगृहात पाठविले आहे.

बिग ब्रेकिंग : पारस ललवानींविरुद्ध गुन्हा दाखल करणारी महिला खंडणी घेताना जाळ्यात

0
paras lalvani

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२१ । जामनेर तालुक्यातील प्रसिद्ध व्यावसायिक माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांच्याविरोधात काही महिन्यांपूर्वी एका महिलेने विनयभंगची तक्रार केल्याने पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा मागे घेत न्यायालयात ललवाणी यांच्या बाजूने साक्ष देण्यासाठी महिलेने तब्बल २५ लाखांची खंडणी मागितली असून रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लासलगाव पोलिसात याप्रकरणी आ.गिरीष महाजन यांचे निकटवर्तीय समजले जाणारे प्रफुल्ल लोढा यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी माजी मंत्री आ.गिरीष महाजन यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर काही दिवसांनीच ललवाणी यांच्या विरोधात अल्पवयीन मुलीचा बळजबरीने विवाह लाऊन देण्यासह विनयभंग केल्याप्रकरणी ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. ललवाणी यांच्याविरुद्ध श्रीरामपूर (जि.अहमदनगर) येथे गुन्हा दाखल झाला असून शून्य क्रमांकाने जामनेर पोलीस स्थानकात वर्ग करण्यात आला होता.

पारस ललवाणी यांच्याविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यात ते सांगतील त्याप्रमाणे न्यायालयात लिहून देण्यासाठी संबंधित महिलेने २५ लाखांची खंडणी मागितली होती. आपल्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी कुणी प्रवृत्त केले याची माहिती घेतल्यानंतर ललवाणी यांनी महिलेला पोलिसांच्या जाळ्यात अडकविण्याचे ठरविले. बुधवारी लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कोथले व कर्मचाऱ्यांनी सापळा रचून महिलेला रंगेहाथ अटक केली.

२५ लाखांची मागितली खंडणी, तिघांवर गुन्हा

ललवाणी यांनी पोलिसांमार्फत सापळा रचला महिलेला देण्यासाठी २५ लाखांच्या बंडलाची बॅग रचण्यात आली त्यात कोऱ्या नोटांवर असली ५० हजारांच्या नोटा लावल्या होत्या. महिलेला रंगेहात पकडण्यात आले असून याप्रकरणी लासलगाव पोलिसात अलकेश झुंबरलाल ललवाणी यांच्या फिर्यादीवरून ज्योती चंदूलाल कोठारी, सुनील कोचर, प्रफुल्ल लोढा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

लासलगाव पोलीस स्थानकाचे प्रभारी अधिकारी राहुल वाघ यांनी ‘जळगाव लाईव्ह न्यूज’सोबत बोलतांना याबाबत माहिती दिली आहे.

लसीकरणाच्या मुद्द्यावरून महापौरांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी

0
mayor jayashree mahajan

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२१ । जळगाव शहरातील मनपाच्या कोविड लसीकरण केंद्रांवर गोंधळ होत असून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना महापौर जयश्री महाजन यांनी केल्या.

मनपाच्या कोविड लसीकरण केंद्रांचा आढावा घेण्यासाठी महापौर जयश्री महाजन यांनी मनपात वैद्यकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. बैठकीला उपमहापौर कुलभूषण पाटील, मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी, प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ.राम रावलानी आदींसह इतर अधिकारी उपस्थित होते.

समन्वय अधिकाऱ्याची नेमणूक करा

जळगावातील मनपाच्या सर्व लसीकरण केंद्रांचा आढावा घेऊन त्याठिकाणी काय व्यवस्था हवी, नागरिकांच्या आणि अधिकाऱ्यांच्या अडचणी काय आहेत हे जाणून घेण्यासाठी व प्रशासनाशी समन्वय साधण्यासाठी एक समन्वय अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशा सूचना मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी यांनी दिल्या.

महापौरांनी केल्या सूचना

लसीकरण केंद्रावर नागरिकांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. प्रसार माध्यमातून देखील तसे वृत्त प्रकाशित झाले आहे. लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध आहे की नाही याबाबत दर्शनी भागात फलक लावावा, उन्हाळ्याचे दिवस असल्याने सावलीसाठी ग्रीन नेट किंवा मंडप टाकावे, बसण्यासाठी योग्य व्यवस्था करावी, मनुष्यबळ वाढवावे, नियोजन ठेवण्यासाठी आवश्यकता असल्यास प्रत्येक लसीकरण केंद्रावर २ महिला, २ पुरुष सुरक्षारक्षक, पोलीस कर्मचारी नेमण्यात यावे अशा सूचना महापौर जयश्री महाजन यांनी केल्या.

शहरात लसीकरण केंद्रे वाढवा

शहरातील पिंप्राळा, जुने जळगाव, हरीविठ्ठल नगरसह इतर परिसरात लसीकरण केंद्र सुरू करणे आवश्यक आहे. शासनाच्या नियमांना अनुसरून जास्तीत जास्त लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सुचना उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी दिल्या.

पॉझिटिव्ह रुग्णांचा १०० टक्के शोध घ्या

जळगाव शहरात गृहविलगीकरणात असलेले रुग्ण बाहेर फिरत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. पॉझिटिव्ह आलेले काही रुग्ण कुठे आहेत याचा देखील शोध घेतला जात नसल्याची माहिती आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व रुग्णांनी विलगीकरणात राहणे आवश्यक आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी रुग्णांचा शोध घ्यावा आणि जे नियम मोडतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे. दररोज १०० टक्के रुग्ण शोधले जायला हवे अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.

माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिम चोख राबवा

राज्य सरकारने जिल्ह्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबविण्याच्या सूचना केल्या आहे. जळगाव शहरात देखील मोहीम चोखपणे राबविण्यासाठी योग्य नियोजन करून लवकरात लवकर प्रत्येक घरी जाऊन तपासणी करा. मोहिमेत सहभागी होण्यासाठी जे टाळाटाळ करीत असतील त्यांना नोटीस बजावावी. मोहिमेत फिरणाऱ्या रोजे असलेल्या शिक्षकांना सकाळच्या वेळी आणि दुपारनंतर आपले कार्य पार पाडण्याची सवलत द्यावी. पुढील १५ दिवसात संपूर्ण मोहीम पार पाडण्यात यावी, अशा सूचना देखील महापौर जयश्री महाजन यांनी दिल्या.

विवाह सोहळ्याला क्षमतेपेक्षा जास्त लोकांची उपस्थिती ; आयोजकास ५० हजाराचा दंड

0
wedding

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२१ । सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिाकर्यांच्या आदेशान्वये केवळ २५ जणांच्या उपस्थितीतच विवाह करण्याला परवानगी दिलेली आहे. असे असतानाही क्षमतेपेक्षा जास्त लोक जमवून कन्नडरोडस्थित कमलशांती पॅलेज या हॉटेलमध्ये विवाह सोहळा साजरा करणाऱ्या लासूर येथील विवाह सोहळा आयोजकावर आज बुधवारी पालिकेतर्फे ५० हजारांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामुळे काहीवेळ येथे वऱ्हाडी मंडळींमध्ये खळबळ उडाली होती.

याबाबत असे की, कन्नड रस्त्यावरील कमलशांती पॅलेज या हॉटेलमध्ये आज लासूर (जि. औरंगाबाद) येथील विवाह सोहळा पार पडत होता. या विवाह सोहळ्यासाठी संपूर्ण हॉटेल बुक करण्यात आली होती. उच्चभ्रू कुटुंबातील विवाह असल्याने अनेक चारचाकी वाहने हॉटेलच्या बाहेर तसेच हॉटेलपासून काही अंतरावर शेतात लावलेली होती. त्यामुळे या विवाह सोहळ्यात २५ पेक्षा जास्त लोक उपस्थित असल्याची खबर कोरोना प्रतिबंधक पथकाला मिळाल्यानंतर येथे छापा टाकण्यात आला. जवळपास १५० ते १६० वऱ्हाडी उपस्थित असल्याचे आढळून आले.

कोरोना महामारीत शासनाने जारी केलेल्या निर्देशात विवाह सोहळ्यात २५ हून अधिक व्यक्ति उपस्थितीचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले. महसूलसह पालिका व पोलिसांच्या संयुक्त पथकाने विवाहाच्या आयोजकांकडून ५० हजाराचा दंड वसूल केला. मंगल कार्यालयाच्या मालकांकडूनही दोन दिवसांपूर्वी पाच हजाराचा दंड पथकाने वसूल केल्याची माहिती देण्यात आली.

दिलासादायक : जळगाव जिल्ह्यात आज बाधित पेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक

0
corona update

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२१ । जळगाव जिल्ह्यात आज बुधवारी कोरोनाच्या नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज दिवसभरात १ हजार १२५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. तर आज १ हजार ०६ नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे.

मार्च व एप्रिलच्या प्रारंभी कोरोनाने घातलेले थैमान जिल्ह्यात काहीअंशी कमी झाले आहे. गेल्या दोन आठवड्यांपूासून नव्याने बाधितांची संख्या स्थिर असून बरे होणाऱ्यांचा आकडा समाधानकारक आहे. आज बुधवारी १००६ नवे रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या १ लाख १९ हजार ९३४ वर गेली आहे. आज ११२५ रुग्ण बरे झाले असून बरे होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ७ हजार ०२६ वर गेला आहे. दरम्यान आज दिवसभरात २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण मृताचा आकडा हा २१४२ वर गेला आहे. जिल्ह्यात सध्या १० हजार ७६६ रुग्णांवर उपचार सुरु आहे.

जळगाव शहरासाठी दिलासा

मागील काही दिवसापासून जळगाव शहरात नव्या बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे हॉटस्पॉट ठरलेल्या शहराला हा दिलासादायक आहे. आज जळगाव शहरात १७३ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आजच २२० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. त्यामुळे शहरातील सक्रिय रुग्णसंख्याही घटत आहे. शहरात सध्या एक हजार ८३९ रुग्ण उपचार घेत आहे. शहरात आजपर्यंत ४९५ जणांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव शहर- १७३ जळगाव ग्रामीण- ४७, भुसावळ-१३०, अमळनेर-६०, चोपडा- ९७, पाचोरा- ४७, भडगाव-११, धरणगाव- ३३, यावल- २५, एरंडोल- ७३, जामनेर- ३८, रावेर- ७०, पारोळा- २०, चाळीसगाव- ५०, मुक्ताईनगर- ९०, बोदवड-३५ आणि इतर जिल्हे ०७ असे एकुण १००६ बाधित रूग्ण आढळले आहे.

मी कोणाचे पाय चाटत नाही… गिरीश भाऊंना राजकारणात जन्माला मी आणले : एकनाथ खडसे

0

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२१ । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे Eknath Khadse आणि गिरीश महाजन Girish Mahajan यांच्यात व्हायरल ऑडियो क्लीपवरुन सुरु झालेला वाद चांगलाच वाढला आहे. गिरीश महाजन यांनी खडसेंचं मानसिक संतुलन बिघडल्याची अतिशय बोचरी टीका खडसेंवर केली होती. या टीकेवर एकनाथ खडसेंनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

गिरीश महाजन यांचा आपल्याला सर्व इतिहास माहिती असून त्यांना राजकारणात जन्माला मी आणलं, असं मोठं विधान खडसे यांनी केलं आहे. यासोबतच त्यांच्या राजकारणात आर्थिक मदत मी दिली. त्यांच्या प्रचारासाठी गल्लोगल्ली मी फिरलो. म्हणून आज गिरीश भाऊ दिसत आहेत. मी कोणाची हाजीहाजी करत नाही. मी कोणाचे पाय चाटत नाही अशी खोचक टीका देखील नाथाभाऊंनी केली आहे.

एकनाथ खडसेंच वय झाल्याने मानसिक संतुलन बिघडलंय; गिरीश महाजनांची टीका

एकनाथ खडसेंच वय झाल्याने मानसिक संतुलन बिघडलंय; गिरीश महाजनांची टीका

नेमकं प्रकरण काय?

एकनाथ खडसे यांच्या दूरध्वनीवरील संभाषणाची एक ऑडिओ क्लीप सध्या व्हायरल झाली आहे. या क्लीपमध्ये जामनेरमधील एक व्यक्ती पाणी नसल्याची तक्रार एकनाथ खडसे यांना करताना ऐकू येत आहे. त्यावर एकनाथ खडसे यांनी मग मग तुमचा आमदार गिरीश मेला का? तो फक्त पोरींचे फोन उचलतो, असे वक्तव्य केले. या क्लीपवर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी खडसे यांचं मानसिक संतुलन बिघडल्याचं वक्तव्य केलं.

एकनाथ खडसे यांची व्हायरल होणारी ऑडिओ क्लीप ऐका :

https://www.facebook.com/114263107373939/videos/837646906829667/

एकनाथ खडसेंच वय झाल्याने मानसिक संतुलन बिघडलंय; गिरीश महाजनांची टीका

0

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२१ । एकनाथ खडसेंच्या व्हायरल फोन संवादानंतर गिरीश महाजन यांनी यावर अतिशय बोचरी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसेंना मुख्यमंत्री पदाची अपेक्षा असताना आमदारकी देखील मिळाली नाही. वाढतं वय, आजारपण यामुळे बिचाऱ्या खडसेंचे मानसिक संतुलन बिघडलं असल्याचे गिरीश महाजन म्हणाले आहेत.

गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदार संघातील एका गावात पाणी येत नसल्याची तक्रार एका विद्यार्थ्याने एकनाथ खडसेंना फोन वर केली. फोन वरील संभाषणात खडसेंनी तुमचा आमदार मेला का, पोरींचेच फोन उचलतो, बायकांमागे फिरतो अशी टीका केली होती. ते संभाषण प्रचंड व्हायरल झाल्यानंतर महाजन यांनी खडसेंना उत्तर दिलं आहे.

व्हायरल व्हिडीओ पहा :

https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/837646906829667/

स्वस्त धान्य दुकानदार विविध मागण्यासाठी १ मे पासून बेमुदत संपावर

0
jalgaon news

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२१ । स्वस्त धान्य दुकानदारांनी विविध मागण्यासाठी १ मे पासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपाबाबत आज बुधवारी ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉप किपर्स फेडरेशन पुणे सलग्न जळगाव शहर व ग्रामीण रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पुरवठाअधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

यांची होती उपस्थिती

याप्रसंगी सुभाष जैन,तुकाराम निकम,फिरोज पठाण ,शैलेश जैन, हेमरत्न काळुंखे, अतुल हराळ प्रताप बनसोडे तथा महासंघाचे जिल्हाध्यक्षअध्यक्ष सुनील जावळे, महेंद्र बोरसे, भागवत पाटील,सुनील अंभोरे उपस्थित होते.

या आहेत मागण्या?

शासनाने स्वस्त धान्य दुकानदारांचा ५० लाखांचा विमा संरक्षण कवच द्यावे, कोरोनाचा संसर्ग पाहता धान्य वितरण करताना लाभार्थ्यांची बायोमेट्रिक सक्ती न करता दुकानदारांचेआधार प्रमाणित करून अन्न धान्य वाटपाची मुभा द्यावी, स्वस्तधान्य दुकानदारांना चतुर्थ श्रेणी कर्मचारीचा दर्जा द्यावा , वाढत्या महागाई पाहता कमिशन वाढवून द्यावे, थंब स्कॅनरला युएसबी मार्फत एक्सटेन्शन करुन मिळावे, अशा विविध मागण्याकरीता ऑल महाराष्ट्र रेशन दुकानदार फेडरेशनचे अध्यक्ष गजानन बाबर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक १ मे पासून पासून राज्यभरात राज्यव्यापी संप पुकारला आहे.

जळगाव शहरातील तसेच तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार हे संपात सहभागी होणार आहेत. असे निवेदनात नमूद आहे. हे निवेदन आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांना देण्यात आले.

डोंगर कठोरा येथे शेतमजुराची विहीरीत उडी घेवून आत्महत्या

0
crime

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२१ । यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथील एका शेतमजुराने विहीरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना आज बुधवारी सकाळी उघडकीस आली. भरत जनार्दन जंगले (वय-४५) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, आत्महत्येमागील कारण अद्यापही कळू शकले नाही. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत असे की, डोंगर कठोरा येथील भरत जंगले हे शेतात काम करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात.  दरम्यान, २७ एप्रिल रोजी सायंकाळी ते घरातून निघाले. रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोधाशोध केली परंतू आढळून आले नाही.

आज २८ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास डोंगर कठोरा शिवारातील विनोद मधुकर राणे यांच्या शेतातील विहिरीत मृतदेह आढळून आला. हा मृतदेह भरत जंगले यांच्याच असल्याचे उघड झाले. दरम्यान त्यांनी आत्महत्या करण्याचे कारण स्पष्ट झालेले नाही.  शेतमालक विनोद रोणे यांच्या खबरीवरून यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.