जळगाव लाईव्ह न्यूज । २३ सप्टेंबर २०२२ । पावसाळा संपताच राज्यातील खड्डे दुरुस्तीला एक ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे. नोव्हेंबर पर्यंत सर्व खड्ड्यांचे काम पूर्ण करण्यात येणार असून संपूर्ण महाराष्ट्र राज्य खड्डे मुक्त होणार आहे. यासाठी सुमारे 500 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे देण्यात आली आहे

पावसामुळे तसेच निकृष्ट कामामुळे शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण झाली आहे. यावर्षी रस्त्यांमुळे अपघात होऊन अनेकांना प्राण गमवावा लागला आहे. गेल्या आठवड्यात पार पडलेल्या अभियंता दिनाच्या कार्यक्रमात बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी विभागातील अभियंतांचे कान उपटले होते. यानंतर बांधकाम विभागाने तातडीने निर्णय घेऊन वार्षिक देखभाल दुरुस्ती अंतर्गत रस्ते खड्डे मुक्त करण्याचे काम सुरू करणार असल्याची माहिती दिली

महाराष्ट्र राज्यात महामार्ग, जिल्हा महामार्ग व इतर रस्ते असे मिळून जवळपास 18 हजार किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. सध्या 35 ते 40 टक्के रस्त्यांवर खड्डे आहेत. खड्डे भरण्यावर जवळपास 500 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. नव्या रस्त्यांची कामे हाती घेण्यासाठी ‘नाबार्ड’ करून 2022 – 23 या वर्षासाठी साडेसातशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे.












