जळगाव लाईव्ह न्यूज । खरीप हंगाम २०२६-२७साठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू करण्यात आली असून, शेतकऱ्यांनी ३१ जुलै २०२६ पूर्वी योजनेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

शासनाच्या ३ जुलै २०२६ च्या निर्णयानुसार एचडीएफसी ई. जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येणार आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यात येते.

जिल्ह्यातील अधिसूचित क्षेत्रांमध्ये ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, तीळ, सोयाबीन आणि कापूस या पिकांचा योजनेत समावेश करण्यात आला आहे अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकासाठी खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. मात्र भाडेपटीने शेती करणाऱ्यास नोंदणीकृत भाडेकरार पिक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक असून शेतकऱ्यांनी खरीप पिकासाठी विमा संरक्षित रकमेच्या २ टक्के विमा हप्ता भरुन सहभाग घ्यावा लागेल,कापूस व इतर व्यापारी पिकांसाठी हा विमा हप्ता विमा संरक्षित रकमेच्या ५ टक्के असुन पिक विमा पोर्टलवर नोंदणी करावयाची आहे तसेच सर्व अधिसुचित पिकांसाठी जोखिमस्तर ७० टक्के असा करण्यात आलेला आहे.
योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रंमाक Farmer ID, डिजिटल क्रॉप सर्वे (ई-पीक पाहणी), बँक पासबुक ,आधार कार्ड, पीक लागवड घोषणापत्र आदी कागदपत्रे आवश्यक असून किमान ०.१० हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक असून मृत शेतकऱ्यांच्या नावे व इतर अवैध मार्गाने विमा काढला गेल्यास अर्ज रद्द करण्यात येईल तसेच संबंधित शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षे कृषी विभागाच्या डीबीटी योजनांपासून वंचित राहावे लागू शकते.
योजनेत ज्वारी, बाजरी, भुईमूग, सोयाबीन, तीळ, मूग, उडीद, तूर, कापूस आणि मका या अधिसूचित पिकांचा समावेश करण्यात आला आहे. या पिकांसाठी जोखीम स्तर ७० टक्के निश्चित करण्यात आला असून, ज्वारीसाठी विमा संरक्षित रक्कम रु.३३,०००, बाजरी रु.३२,०००, भुईमूग रु.४५,०००, सोयाबीन रु.५९,४००, तीळ रु.२७,०००, मूग रु.३०,०००, उडीद रु.२७,०००, तूर रु.४१,२५०, कापूस रु.५३,२४० आणि मका रु.४०,००० इतकी आहे. पिकानुसार शेतकरी विमा हप्ता रु.८० ते रु.१,३३१ पर्यंत असून अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२६ आहे.
शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता बँक, कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) किंवा स्वत: शेतकरी ऑनलाइन पोर्टलद्वारे अर्ज करून प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२६-२७ करीता कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विमा योजनेत भाग घेण्यासाठी अंतिम दि.३१ जुलै २०२६ पर्यंत आहे तरी आज पासूनच पिकाचा विमा काढण्यात यावा, जेणेकरून शेवटच्या दिवशी घाई होणार नाही. नैसर्गिक आपत्ती पासून नुकसान टाळण्यासाठी पिक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे , असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांनी केले आहे.







