⁠ 
सोमवार, डिसेंबर 2, 2024
Home | जळगाव जिल्हा | मुक्ताईनगर | गुटखा तस्करीला पाठबळ देणारा जळगाव जिल्ह्यातील बडा पुढारी कोण?

गुटखा तस्करीला पाठबळ देणारा जळगाव जिल्ह्यातील बडा पुढारी कोण?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | ४ मार्च २०२३ | मुक्ताईनगर मतदारसंघाच्या सीमेवरून मध्य प्रदेशातून रोज लाखो रुपयांचा गुटखा महाराष्ट्रात येतो. मुक्ताईनगरसह जिल्ह्यात राजकीय वरदहस्ताने गुटखा तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गुटखा तस्करीतील आरोपी हा एका बड्या पुढार्‍याचा जवळचा व्यक्ती आहे, असा गौप्यस्पोट राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे यांनी गुरुवारी विधान परिषदेत केला. विशेष म्हणजे, जळगाव जिल्ह्यातील गुटखा तस्करीचा मुद्दा विधानपरिषदेत गाजताच त्याच रात्री मुक्ताईनगरात अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने एका वाहनातून प्रतिबंधित विमल गुटख्याचा साठा पकडला. त्याची किंमत ५० लाख रुपये असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामुळे आता गुटखा तस्करीला पाठबळ देणारा जळगाव जिल्ह्यातील बडा पुढारी कोण? अशी चर्चा सुरु झाली आहे.

काय म्हणाले होते एकनाथ खडसे?
एकदा आपल्या घराजवळच्या रस्त्यावर १५ लाखांचा गुटखा पकडला. मात्र, तो पोलिसांनी कमी रकमेचा दाखविला. त्या ठिकाणी पोलिसांनी पंचनामा केला आणि गुन्हेगार पळून गेला, असे दाखविले. पोलिसांकडून असा हलगर्जीपणा होत असेल तर कसे होईल? पोलिस अधिक्षकासारखा अधिकारी हतबल ठरत आहे. पोलिस अधीक्षकांना दारू, मटका, जुगार, गांजा याबाबत आपण सांगून सांगून कंटाळलो.

आपण विधी मंडळात तिसर्‍यांदा हा प्रश्न उपस्थित करीत आहोत. हे हप्ते बंद होणार आहेत, की नाहीत? खालपासून वरपर्यंत कोट्यवधी रुपयांचे हप्ते जात आहेत. आमचा पीएसआय महिन्याचे एक कोटी रुपये घेतो, हे आजचे नाही. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. कोण किती रुपये घेतो, हे आपण नागपूर अधिवेशनात आकडेवारीनिशी सांगितले होते. फौजदाराला दहा लाख, पोलिस उपअधीक्षकाला १५ लाख, अतिरिक्त पोलिस अधीक्षकाला किती? अधीक्षकाला किती? डीआयजी किती रुपये घेतात, हे आपण जाहीर सांगितले होते.

आमदार एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेत मुक्ताईनगर तालुक्यातील अवैध धंद्यांबाबत विधानपरिषदेत लक्षवेधी प्रश्न उपस्थित केल्यानंतर काही तासांमध्येच मुक्ताईनगर शहरातील या प्रवर्तन चौकात गुरुवारी (ता.२) रात्री आठच्या सुमारास अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने एका वाहनातून प्रतिबंधित विमल गुटख्याचा साठा पकडला. त्याची किंमत अंदाजे ५० लाख रुपये असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे सुरक्षा अधिकारी आर.एम. भरकड आणि उपायुक्त कांबळे यांच्यासह कर्मचार्‍यांच्या पथकाने ही कारवाई केली. यावर प्रतिक्रीया देतांना खडसे म्हणाले की, ही कारवाई फक्त हिमनगाचे टोक आहे. मुक्ताईनगरसह जिल्ह्यात राजकीय वरदहस्ताने गुटखा तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या प्रकरणातील आरोपी हा एका बड्या पुढार्‍याचा जवळचा व्यक्ती असल्याची माहिती मी पोलीस अधिक्षकांना दिली असल्याचे खडसे यांनी सांगितले.

author avatar
डॉ. युवराज परदेशी
पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.