जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात प्रेमविवाह केल्याच्या रागातून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमविवाहाच्या रागातून एका तरुणाला नग्न करून खांबाला बांधून अमानुष मारहाण करण्यात आली.

एवढ्यावरच न थांबता या नराधमांनी तरुणाचा रुमालाने गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना भुसावळ शहराजवळच असलेल्या खडका गावात घडली आहे. चेतन दिलीप जंगले (२५, रा. खडका) असं मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये कोमल प्रकाश पाटील (२४), विजय नरोत्तम पाटील (५२), हेरंब महेश चौधरी (१९), ज्ञानेश्वर भास्कर भोई (१९) व संजय सोनू बढे (६१) यांचा समावेश आहे. त्यांना २५ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
काय आहे घटना?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका गावातील तरुण- तरुणीने १८ मार्च २०२६ रोजी नाशिक येथे प्रेमविवाह केला. विवाहानंतर १९ मार्च रोजी त्यांनी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात हजर राहून विवाहाची माहिती दिली आणि दोघे जण तरुणाच्या मामाच्या घरी मुक्कामी होते. २० मार्च रोजी तरुणीचे नातेवाइक व इतर १० ते १२ जणांनी तरुणाच्या मामाच्या घरी जाऊन तरुणीला मारहाण करत पळवून नेले. यानंतर संशयितांनी तरुणास खांबाला बांधून नग्न करत, लोखंडी रॉड व दगडाने मारहाण केली. त्यानंतर संशयितांनी या तरुणाला दुचाकीने त्यांच्या गावातील घरापर्यंत आणत मारहाण केली. त्याच्या आई-वडिलांनाही घर जाळण्याची धमकी दिली.
जखमी अवस्थेत तरुणाला जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याचा हात फॅक्चर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना उघडकीस आल्यानंतर अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते तसेच विभागीय पोलिस अधिकारी केदार बारबोले यांनी घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण घटनेची माहिती घेतली व तपासाबाबत सूचना दिल्यात.











