⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

भुसावळ गुन्हेगारीमुक्त करणार ! – पोलिस अधीक्षक एम.रामकुमार

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ नोव्हेंबर २०२२ । भुसावळ शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर निश्चितच अंकुश लावण्यात येवून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येईल शिवाय जिल्ह्यात वाढलेल्या दुचाकी चोरींच्या घटना पाहता यासंदर्भात विशेष उपाययोजना राबवण्यात येतील तसेच सरप्राईज चेकींग तसेच नाकाबंदी लावून विशेष पथकांच्या माध्यमातून दुचाकी चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्ह्याचे नूतन पोलिस अधीक्षक एम.रामकुमार यांनी येथे दिली. मंगळवार, 8 रोजी शहरातील तीनही पोलिस ठाण्यांना त्यांनी भेट देत पाहणी केली तसेच भुसावळ शहराची वाहनातूनही त्यांनी पाहणी केली.

पोलिस उपअधीक्षकांकडून गुन्ह्यांचा घेतला आढावा
नूतन पोलिस अधीक्षक एम. रामकुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहराला मंगळवारी प्रथमच भेट देत डीवायएसपी कार्यालय, तालुका पोलिस ठाणे, शहर वाहतूक शाखा, शहर पोलिस ठाणे, बाजारपेठ पोलिस ठाण्याला भेट पोलिस उपअधीक्षकांकडून गुन्ह्यांचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्या समवेत डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, निरीक्षक राहुल गायकवाड, तालुक्याचे निरीक्षक विलास शेंडे, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक स्वप्निल नाईक, सहायक निरीक्षक मंगेश गोटला, उपनिरीक्षक अंबादास पाथरवट आदी उपस्थित होते.

बेसिंग पोलिसींगवर प्रशासनाचा भर
जळगाव जिल्ह्यातील गुन्हेगारीचा वाढता आलेख तसेच दुचाकी चोरीच्या सातत्याने घडत असलेल्या घटनांबाबत नूतन अधीक्षकांना विचारले असता ते म्हणाले की, पोलिस प्रशासनाकडून वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यावर भर असेल तसेच दुचाकी चोरींच्या घटना रोखण्यासाठी सरप्राईज चेकींग, नाकाबंदी तसेच विशेष पथकाचे गठण करण्यात येईल तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर पोलिस प्रशासनाचे बारकाईने लक्ष असेल, असेही ते म्हणाले. ग्रामीण भागातून शेतीची अवजारे चोरीच्या जाण्याच्या प्रकारात वाढ होत असल्याने हे प्रकार रोखण्यासाठीही देखील लक्ष केंद्रीत करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

पोलिस वसाहतींची केली पहाणी
भुसावळ शहर वाहतूक शाखेचा आढावा घेतल्यानंतर अधीक्षक रामकुमार यांनी पोलिस वसाहतीची पाहणी केली. वास्तव्यास असलेली कुटूंबे, उपलब्ध निवासस्थाने आहेत, वसाहतीत लावलेली खेळणी यांची पाहधी अधीक्षकांनी केली. पोलिस वसाहतीमधील व्यायाम शाळेची माहिती डीवायएसपी यांच्याकडून घेण्यात आली.