Bhusawal : अभियंत्याचे बंद घर फोडून चोरट्यांनी लांबविला लाखोंचा ऐवज ; गुन्हा दाखल

मार्च 31, 2026 11:29 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात घरफोडीच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नसून दिवसेंदिवस याच्यामध्ये वाढ होताना दिसत आहे. चोरट्यांना खाकीचा धाकच नसल्याचं दिसतेय. अशातच भुसावळ शहरातील फातेमा कॉलनीत घरफोडी झाली. चोरट्यांनी बंद असलेले घर फोडून सव्वादोन लाखांची रोकड व ५३ ग्रॅम सोने व चांदीचे दागिने असा एकूण ६ लाखांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

bslgharfodi

फातेमा कॉलनी, प्लॉट क्र.४३ मधील रहिवासी तथा जळगावच्या जैन एरिगेशनमध्ये अभियंता असलेले वसीम शेख हे २८ मार्च रोजी नातेवाइकांच्या लग्नासाठी बाहेरगावी गेले होते. यामुळे घर बंद होते. ही संधी चोरट्यांनी साधली. शेख कुटूंब सोमवारी (दि.३०) पहाटे घरी आल्यानंतर त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेला व घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त आढळले. लोखंडी कपाटाचे लॉकर उघडे दिसले. यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले. पहाटे बाजारपेठ पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी पाहणी केली.

हा मुद्देमाल लांबवला
शेख यांच्या घरातून ८ ग्रॅम वजनाची व ४० हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत, ९ ग्रॅम वजनाच्याव ४५ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बाळ्या, तीन ग्रॅम वजनाचे व १५ हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र, २० ग्रॅम वजनाच्या व एक लाख रुपये किमतीच्या अंगठ्या, सात ग्रॅम वजनाची ३५ हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी, दोन ग्रॅम वजनाच्या व दहा हजार रुपये किमतीच्या नाकातील फुल्या, चार ग्रॅम वजनाचे २० हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र, चांदीचे २० ग्रॅम वजनाचे व २० हजार रुपये किंमतीचे क्वॉइन, शंभर ग्रॅम वजनाचे व १५ हजार रुपये किंमतीचे चांदीचे पायल व सव्वा दोन लाखांची रोकड असा ऐवज चोरट्यांनी लांबवला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now