भुसावळातील घरफोडी प्रकरणाचा अवघ्या काही तासांत छडा; लाखोंचा मुद्देमाल जप्त

एप्रिल 4, 2026 12:17 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ शहरात घडलेल्या घरफोडीच्या गंभीर गुन्ह्याचा पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावत आरोपीला अटक केली असून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणात अमीर खान हबीब खान (वय 35, रा. न्यू ईदगाह परिसर, भुसावळ) याला अटक करण्यात आली आहे.

bslgharfodi

भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत फातेमा कॉलनी परिसरातील रहिवासी वसीम अहमद शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते 28 ते 30 मार्चदरम्यान घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात घरफोडी करून सुमारे 5 लाख 70 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

तपासादरम्यान पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत संशयिताची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने कारवाई करत अमीर खान हबीब खान याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने एका विधीसंघर्षग्रस्त अल्पवयीन मुलासोबत घरफोडी केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेल्या मालापैकी 4 लाख 99 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे. उर्वरित मुद्देमालाचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now