⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

गिरीश महाजन यांना भारतीय जनता पक्षाने दिला मोठा धक्का ? डीमोशन झाल्याच्या चर्चा

जळगाव लाइव्ह न्यूज । २७ मे २०२३ । भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकत्याच उत्तर महाराष्ट्रामध्ये महत्त्वाच्या नियुक्ती केल्या. यामध्ये राजेंद्र गावित यांच्याकडे नाशिक शहर व दोन्ही लोकसभा मतदारसंघ याची जबाबदारी देण्यात आली. तर विजय चौधरी यांच्याकडे उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र यात आश्चर्याची बाब म्हणजे मंत्री गिरीश महाजन जे भारतीय जनता पक्षाचे संकट मोचक समजले जातात त्यांना कोणतीही जबाबदारी पक्षाने दिलेली नाही.

भारतीय जनता पक्ष येणाऱ्या निवडणुकीच्या तयारी लागला असून यासाठी संघटनात्मक कामाला पक्षाने सुरुवात केली आहे. राधेकृष्ण विखेपाटील जे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व मंत्री आहेत त्यांना शासन आणि पक्षाचे पदाधिकारी यांच्यात समन्वय ठेवण्याचे काम देण्यात आले आहे.

राज्यात सत्ता परिवर्तन झाल्या त्यानंतर गिरीश महाजन यांना मोठी संधी मिळेल असे म्हटले जात होते. गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकचे पालकमंत्री पद नक्कीच असणार अशाही चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र अचानकपणे ते मंत्रिपद शिंदे गटाचे दादा भुसे यांना मिळालं तर दुसरीकडे नाशिकची जबाबदारी ही विखे पाटील मंत्री असतानाही त्यांना देण्यात आली. मात्र गिरीश महाजन यांना जवाबदारी मिळाली नसल्याने विविध चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाले आहेत.

एकीकडे 2014 नंतर भारतीय जनता पक्षाने संपूर्ण उत्तर महाराष्ट्राची सूत्रे हे गिरीश महाजन यांच्याकडे दिली होती. प्रशासकीय आणि पक्ष सर्व जबाबदाऱ्या या गिरीश महाजन यांच्याकडे असल्यामुळे गिरीश महाजन यांना सत्तांतर झाल्यावर मोठी संधी मिळेल असे म्हटले जात होते.

मात्र सत्तांतर होऊन आता वर्ष उलटत आले तरी गिरीश महाजन यांना भारतीय जनता पक्ष धक्का देत असल्याचेच पाहायला मिळत आहे. यामुळे येत्या काळात नक्की राजकारणामध्ये काय बदल होतात हे पाहणं अति उत्सुकतेच ठरणार आहे .