⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

अपुर्ण घरकुले असणाऱ्या ५ ग्रामसेवकांना नोटीसा बजावण्याचे आदेश

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२२ । भुमिहीन लाभार्थ्यांना घरकुलांसाठी जागा उपलब्ध करुन देणे. अपुर्ण घरकुलांचे कामे पुर्ण करण्यात यावे. यासह भडगाव तालुक्यातील विविध योजनांची कामे, विकास कामांबाबत इतर विषयांवर जळगाव जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. पंकज आशिया यांनी आढावा बैठक घेउन अपुर्ण कामे पुर्ण करण्याच्या कडक सुचना संबंधित अधिकार्यांसह ग्रामसेवकांना दिल्या. तसेच भडगाव तालुक्यात एकुण ५ ग्रामपंचायतीतील गावातील पुर्ण घरकुलांबाबत खरपुस समाचार घेत त्या गावांच्या संबंधीत ५ ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्याचे आदेशही डाॅ. पंकज आशिया यांनी भडगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आर. ओ. वाघ यांना दिलेले आहेत. ही आढावा बैठक आज दि. १२ रोजी सायंकाळी भडगाव पंचायत समितीच्या श्री. छञपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजीत करण्यात आलेली होती. सुरुवातीस जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. पंकज आशिया यांचा सत्कार ग्रामसेवक संघटनेमार्फत करण्यात आला. यावेळी जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. पंकज यांनी शासकीय योजना, विविध कामे, तसेच अपुर्ण घरकुले, भुमिहीन लाभार्थ्यांना घरकुलांसाठी जागा उपलब्ध करुन देणे. जलजीवन मिशन अंतर्गत वैयक्तीक नळ कनेक्शन, सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनाचे कामे पुर्ण करण्यात यावेत. तसेच सार्वजनिक शौचालय, शोषखड्डे, हगणदारी मुक्त गावे करणे. मीयावाॅकी वृक्ष लागवड, शाळा, अंगणवाडी, नवीन शौचालय बांधकाम, शौचालय दुरुस्ती, १५ वा वित्त आयोगाच्या निधी व खर्च, ५ टक्के दिव्यांग खर्च,अंगणवाडी कुपोषीत मुलांना विशेष आहार योजना , विकासकामांसह इतर विषयांवर सखोल आढावा घेत या बैठकीत जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. पंकज आशिया यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. सर्व कामे, योजनांची अपुर्ण कामे पुर्ण करा. दिलेल्या सुचनांचे पालन करा. अन्यथा संबंधितांवर कडक कार्यवाही करण्यात येईल. अशा कडक सुचना उपस्थित विभागवार अधिकार्यांसह ग्रामसेवकांना डाॅ. पंकज आशिया यांनी दिल्या. तसेच भडगाव तालुक्यात अपुर्ण घरकुलांबाबत ५ गावांच्या ग्रामपंचायतींचे ५ ग्रामसेवकांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेशही डाॅ. पंकज आशिया यांनी भडगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आर. ओ. वाघ यांना दिलेल्या आहेत. माञ अपुर्ण घरकुले कोणत्या ५ गावांची आहेत. संबंधित ५ ग्रामसेवक कोण आहेत? ही माहिती मिळु शकली नाही. तसेच इतर कामकाजाबाबत डाॅ. पंकज आशिया यांनी समाधानही व्यक्त केल्याचे प्रशासनाकडुन सांगण्यात आले. या बैठकीस भडगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आर. ओ. वाघ, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी एस. बी. पाटील, ग्रामीण पाणी पुरवठा शाखा अभियंता अनिल चव्हाण, बांधकाम विभाग, पशुसंवर्धन विभाग, महिला बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग यासह विविध शासकीय विभागवार अधिकारी तसेच भडगाव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते. भडगाव पंचायत समितीच्या काही वेळोवेळीच्या बैठकींना अनुपस्थित दिसणारे काही ग्रामसेवक मंडळींची माञ या आढावा बैठकीला मोठया संख्येने उपस्थिती दिसुन आली.