⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

सावधान… तुम्ही दुषित पाणी पितायं; वाचा स्पेशल रिपोर्ट

जळगाव लाईव्ह न्यूज | २८ डिसेंबर २०२२ | नळावाटे येणारे पाणी खरचं शुध्द असते का? असा प्रश्‍न जर तुम्हाला पडत असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. जिल्हा परिषदेने केलेल्या पाहणीत जिल्ह्यातील तब्बल ३८ गावांमध्ये दुषित पाणी पुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. दुषित पाणी पुरवठ्यामुळे ६५ ग्रामपंचायतींना येलो कार्ड देण्यात आले आहे. दुषित पाणी पुरवठ्यामुळे काही गावांमुळे अतिसार, डायरिया, तापासह अन्य साथजन्य आजारांचे प्रमाण वाढत आहे. यास वातावरणातील बदल जितके कारणीभूत आहेत तितकाच दुषित पाणी पुरवठा हे देखील महत्त्वाचे कारण आहे.

ग्रामीण भागात शुध्द पाणीपुरवठा व्हावा यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे दर महिन्याला प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या अंतर्गत येणार्‍या गावांमधील जलस्त्रोतांचे सर्वेक्षण करुन पाणी नमुणे प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येते. नोव्हेंबर महिन्यात पाठविण्यात आलेल्या नमुन्यांपैकी तब्बल ३८ गावांमध्ये अशुध्द पाणीपुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. या अहवालानंतर ६५ गावांना येलोकार्ड देण्यात आले आहे.

येलो, रेड कार्ड म्हणजे काय?
ग्रामीण भागातील पाणी पुरवठ्याच्या गुणवत्ता तपासणीसाठी जलस्त्रोतांचे नमुने घेवून त्याची प्रयोगशाळेत तपासणी केली जाते. ज्या गावांचे स्त्रोत ७५ टक्के दुषित आहेत, अशा गावांना रेड कार्ड दिले जाते. ३५ टक्के स्त्रोत दुषित असलेल्या गावांना ग्रीनकार्ड तर ३५ ते ७५ टक्के जलस्त्रोत दुषित असणार्‍या गावांना येलो कार्ड दिले जातात. सलग पाच वर्षांपासून ज्या गावांमध्ये अतिसार किंवा अन्य कोणत्याही आजाराची साथ नाही अशा गावांना सिल्वर कार्ड दिले जाते. जळगाव जिल्ह्यात असे ९२९ गावे आहेत.

या ३८ गावांमध्ये होतोय दुषित पाणीपुरवठा
दुषित पाणीपुरवठा होणार्‍या गावांमध्ये सर्वाधिक गावे चाळीसगाव तालुक्यातील आहे. यात दहीवद, मेहुणबारे (नवे व जुने), दसेगाव, लोंढे, चिंचगव्हाण, विसापूर, कोदगाव, वलठाण, जामडी, कोंगनगर यांचा समावेश आहे. यासह बोदवड तालुक्यातील येवती, धरणगाव तालुक्यातील हिंगोणे बु. हिंगोणे खु, कढोली, खेडी खु., टाकरखेडा, एरंडोल तालुक्यातील टाकरखेडा, उत्राण, जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र, लोणवाडी, जामनेर तालुक्यातील मोरगाव, टाकरखेडा, लोंध्री बु., मुक्ताईनगर तालुक्यातील नरवेल, रसलपुर, पारोळा तालुक्यातील धुळप्रिंप्री, सावखेडे, टीटवी, टीटसीसीम, चाहुत्रे, रावेर तालुक्यातील रसलपूर, नांदुरखेडा, कांडवेल, भोर, विवरे बु., वाघोड, यावल तालुक्यातील सावखेडा या गावांचा समावेश आहे.