जळगाव लाईव्ह न्यूज । २९ सप्टेंबर २०२५ । २०२५ च्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने ऐतिहासिक विजय मिळवला. भारताने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ५ विकेट्सने हरवून विजेतेपद पटकावले. या ऐतिहासिक कामगिरीनंतर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी भरीव बक्षिसे जाहीर केली आहेत.

बीसीसीआय आपल्या ट्विटमध्ये लिहलं की, ‘३ वार ० प्रतिक्रिया आशिया कप चॅम्पियन. संदेश मिळाला आहे. टीम इंडिया आणि सहकाऱ्यांना २१ कोटी रूपयाच्या बक्षीसाची घोषणा करत आहोत.’ असं बीसीसीआय म्हटलं.

बीसीसीआयने आशिया कप स्पर्धेसाठी मुख्य संघात 15 खेळाडूंना स्थान दिलं होतं. तर टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमध्ये मुख्य प्रशिक्षक, सहाय्यक प्रशिक्षक, बॉलिंग-बॅटिंग आणि फिल्डिंग कोच असे एकूण 5 सदस्य आहेत. असे मिळून हा आकडा 20 होतो. त्यामुळे प्रत्येकाला 1 कोटी रुपये मिळतील, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. तसेच ही रक्कम कमी जास्त होऊ शकते. मात्र बीसीसीआयच्या या निर्णयामुळे खेळाडू आणखी मालामाल होतील इतकं मात्र निश्चित आहे.
रविवारच्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा आशिया कपमध्ये तिसऱ्यांदा पराभव केला. पाकिस्तानला भारतीय फिरकीपटूंनी १४७ धावात रोखत सामन्यावर पकड निर्माण करून दिली होती. त्यानंतर फलंदाजी करताना भारताची सुरूवात खराब झाली होती. मात्र तिलक वर्मा, संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांनी डाव सावरत भारताचा विजय साकार केला. दरम्यान, भारतीय संघानं आशिया क्रिकेट काऊन्सीलचे अध्यक्ष नक्वी यांच्या हातून विजयाची ट्रॉफी आणि मेडल्स घेण्यास नकार दिला. यानंतर मैदानावर ट्रॉफी आणली गेली नाही. त्यामुळं नक्वी यांनी आशिया कपची ट्रॉफी पळवली असा आरोप देखील त्यांच्यावर होत आहे.











