जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२६ । काही दिवसांपूर्वीच जळगाव शहरातून एका बांगलादेशी तरुणाला अटक करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच, आता भुसावळ शहरातही पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. भुसावळमधून एका बांगलादेशी महिलेला बेकायदेशीररीत्या वास्तव्य करताना ताब्यात घेण्यात आले असून तिच्याविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या ४२ वर्षीय बांगलादेशी महिलेचे मूळ नाव फरीदा बेगम मोहम्मद खान (रा. भीमकाठी, उपजिल्हा नाझीरपूर, जिल्हा पीरोजपुर, बांगलादेश) असे आहे. मात्र, भारतात आल्यानंतर ती “जस्मिन बी मोहम्मद खान” या बनावट नावाने दीनदयाल नगर, भुसावळ येथे राहत होती.

प्राथमिक चौकशीत तिने दिलेल्या कबुलीनसार, सन २००९ मध्ये तिने एका दलालाला ५,००० रुपये देऊन बोटीच्या सहाय्याने नदीमार्गे बांगलादेशातून पश्चिम बंगालमध्ये बेकायदेशीररीत्या प्रवेश केला होता. तिथून ती रेल्वेने भुसावळ येथे आली आणि येथेच स्थायिक झाली.
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या महिलेने भारतात कायमचे राहण्यासाठी आणि स्वतःची भारतीय ओळख निर्माण करण्यासाठी तिच्या मृत बहिणीच्या नावावरील लाईट बिल व इतर कागदपत्रांचा गैरवापर केला. त्या आधारे तिने स्वतःचे:रेशन कार्ड, Aadhaar कार्ड, मतदान ओळखपत्र, PAN कार्ड, बँक पासबुक तसेच भारतीय पासपोर्ट तयार करून घेतल्याचे निष्पन्न झाले.
या बनावट भारतीय पासपोर्टच्या आधारे आरोपी महिला मे २०२३ मध्ये बांगलादेशात जाऊन पुन्हा भारतात परत आल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली आहे. सदर प्रकरणात आरोपीस बनावट कागदपत्रे तयार करून देणारे संबंधित व्यक्ती, एजंट व दलाल यांचा शोध सुरू असून प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीकडून Samsung Galaxy मोबाईल जप्त केला. मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणात IMO आणि WhatsApp ॲपवरून +880 या बांगलादेशी कंट्री कोड असलेल्या क्रमांकांशी सातत्याने संपर्क, चॅटिंग आणि व्हिडिओ कॉल्स झाल्याचे पुरावे मिळाले. मोबाईलमध्ये आरोपीच्या जन्मदाखल्याची प्रतही आढळून आली.दरम्यान, जळगाव पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात संशयास्पद व्यक्ती अथवा बनावट कागदपत्रांच्या आधारे वास्तव्यास असलेल्या व्यक्तींबाबत तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी.










