जळगाव लाईव्ह न्यूज । 17 मार्च 2024 । यावल आणि रावेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळी पीक घेतलं जाते. मात्र कधी वादळी वारा तर कधी अती तापमानाने केळी मोठे नुकसान शेतकऱ्यांना पचवावे लागते. यातही योग्य भाव मिळत नसल्याने केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडतो. परंतु सध्या अनेक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याच्या केळी पिकाला फलक भावानुसार दर मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे.
आजरोजी फलक भाव १९०० ते १९५० असून व्यापारी हजार ते ११०० ते १२०० रुपये क्विंटलला मागणी करीत आहेत. फलक भाव ते खरेदी भाव यामध्ये तब्बल सातशे ते आठशे रुपये दरापर्यंत भावामध्ये तफावत आहे. अशा प्रकारे व्यापारी पिळवणूक करीत असल्याची तक्रार परिसरातील शेतकऱ्यांनी केली.
केळी पिकाला वाढविण्यासाठी बळीराजा दिवस रात्र एक करतो. लागवडीपासून तर कापणीपर्यंत मशागतीसाठी खतपाणी, मजुरी, निंदणी, किटकनाशके अशा अनेक खर्चासह केळी पिकासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यात पीकविमा नुकसान भरपाईसाठी शेतकरी पैसे भरून पीकविमा घेतात. त्यामध्ये सुद्धा आश्वासन देऊनही अद्याप काही शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ मिळाला नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
यासाठी कृषी उत्पन्न व खरेदी-विक्री संघाने तसेच लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार यांनी लक्ष देऊन केळी भावासाठी प्रयत्न करण्याची गरज असून, शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी अपेक्षा परिसरातील शेतकऱ्यांकडून व्यक्ती केली जात आहे.