जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२५ । रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. दिवाळी आणि छठपूजेच्या काळात वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर, भारतीय रेल्वेने १५ प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री तात्पुरती स्थगित केली आहे. हा नियम १५ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर २०२५ पर्यंत लागू असेल. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि गर्दी नियंत्रणासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे रेल्वेने सांगितले.

खरंतर दिवाळी काळात रेल्वे स्टेशनवर खूप जास्त गर्दी होते. रेल्वे स्थानकावर पाय ठेवायलाही जागा नसते. यादरम्यान प्रवाशांची संख्या आणि त्यांना सोडवायला येणाऱ्या नातेवाईकांचीही संख्या जास्त असते. त्यामुळे कोणतीही आप्तकालीन परिस्थिती निर्माण होऊ नये, याच पार्श्वभूमीवर रेल्वेनं १५ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबरपर्यंत देशातील १५ प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर बंदी आणली आहे. फक्त रेल्वे तिकीट असणाऱ्या प्रवाशांनाच प्लॅटफॉर्मवर जाता येणार आहे.

दरम्यान, रेल्वेतील काही श्रेणींसाठी सूट देण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवासी, अशिक्षित व्यक्ती किंवा महिलांसोबत आलेल्या इतर व्यक्तींना प्लॅटफॉर्म तिकीट खरेदीसाठी परवानगी आहे. मात्र, तिकीट काउंटवर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील. तुम्हाला त्या प्रश्नांची योग्य उत्तरे द्यायची आहेत. त्यानंतरच तुम्हाला तिकीट दिले जाणार आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षितता आणि गर्दी व्यवस्थापनाच्या दृष्टीने हे पाऊल उचलणे महत्त्वाचे आहे.
या स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकीट बंदी
पश्चिम रेल्वेने दिलेल्या निवेदनानुसार, १५ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान मुंबई वांद्रे टर्मिनस, वापी, उधना आणि सुरत स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटे विकली जाणार नाहीत. त्याच वेळी, मध्य रेल्वेने याच कालावधीत मुंबई विभागातील प्रमुख स्थानकांवर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी), ठाणे, कल्याण आणि पनवेल येथे ही बंदी लागू करण्याची घोषणा केली आहे.नवी जिल्ली, हजरत निजामुद्दीन, आनंद विहार टर्मिनल आणि गाजियाबाद स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकीटवर बंदी घातली आहे.











