---Advertisement---
बातम्या महाराष्ट्र विशेष

शेतकरी आणि अपंग बांधवांच्या हक्कासाठी लढणारे बच्चू कडू

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । बच्चू कडू हे महाराष्ट्रातील राजकारणात एक आदर्श आणि संघर्षशील नेता म्हणून ओळखले जातात. अचलपूर विधानसभा मतदारसंघातून चार वेळा निवडून आलेले हे नेते फक्त राजकारणापुरते सीमित न राहता, विविध आंदोलनांतून शेतकऱ्यांच्या, अपंगांच्या आणि गरिबांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडत आले आहेत. त्यांच्या अनोख्या कार्यपद्धतीमुळे त्यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात आदरानं घेतलं जातं. शेतकऱ्यांचे प्रश्न असोत की अपंगांच्या हक्कांची लढाई, बच्चू कडू यांचा लढा सातत्याने सुरू आहे.

Bachhu Kadu

शेतकरी, महिला, सामान्य वर्गासाठी विशेषतः दिव्यांग बांधवांसाठी बच्चू कडू यांनी उभारलेले कार्य मोठे आहे. बच्चू कडू यांच्या जीवनाचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांचे आणि अपंगांचे हक्क मिळवून देणं आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सगळेच बोलतात. पण, ते सोडविण्यासाठी कृती करीत नाहीत. याला बच्चू कडू अपवाद आहेत. कधी शेतमालाला योग्य भाव मिळावा म्हणून तर कधी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी म्हणून त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांच्या आंदोलक स्वभावामुळेच शेतकऱ्यांना आणि गरीबांना न्याय मिळवून देणारा नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

---Advertisement---

आदिवासींसाठी लढा
आदिवासी समाजाच्या वनपट्टे मिळण्याच्या मागणीकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ बच्चू कडूंनी त्या अधिकाऱ्याच्या घरात साप छोडो आंदोलन करण्याची घोषणा करताच दुसऱ्याच दिवशी आदिवासींना वनपट्टे मंजूर झाले. आदिवासी बांधव परंपरेने कसत असणारी शेतजमीन त्यांच्या नावे करण्याच्या शासकीय अध्यादेशाची अंमलबजावणी होत नसल्याच्या कारणावरून त्यांनी स्वतःला त्या शेतजमिनीत गळ्यापर्यंत गाडून घेण्याचे आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधले होते.

खेड्यापाड्यातून तालुक्याच्या ठिकाणी कामानिमित्त येणाऱ्या शेतकर्‍यांना अधिकारी वेळेवर भेटत नसल्याने बच्चुभाऊंनी अधिकाऱ्याच्या खुर्चीचा लिलाव आंदोलन केले. त्यातून आलेली रक्कम सरकारी खजिन्यात जमा केली. या आंदालानाचा धसका अधिकाऱ्यांनी घेतला आणि ते वेळवर शेतकऱ्यांना भेटू लागले. कापसाची बिले द्यायला शासन उशीर करत असल्याच्या निषेधार्थ बच्चू कड्डू यांनी सामूहिक मुंडन आंदोलन केले. परिणामी शेतकऱ्यांना त्वरित कापसाची बिले देण्याचे आदेश देण्यात आले होते. दारु बंद व्हावी म्हणून दारूच्या दुकानांसमोर “दूध वाटप आंदोलन” केले.

शोले स्टाईल आंदोलन राज्यभर गाजले
अधिकारी वर्ग शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास टाळाटाळ करत असल्याच्या कारणावरून बच्चू कडू आणि त्यांचे अनेकदा अधिकाऱ्यांसोबत वाद झाले आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार काहीच उपाययोजना करत नसल्याने नागपूर हिवाळी अधिवेशन काळात त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून केलेलं शोले स्टाईल आंदोलन राज्यभर गाजले. 700 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाची व मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी बच्चू कडू यांनी स्वीकारली आहे.

अपंग बांधवांसाठीच्या सरकारच्या योजनांची अमलबजावणी व्हावी, यासाठी बच्चूभाऊंनी वेळोवेळी विधीमंडळात आवाज उठवला. आंदोलने केली. आपली प्रहार संघटना दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभी केली. म्हणूनच देशभरातील दिव्यांग बांधवांनी आपले नेतृत्व निर्विवाद बच्चूभाऊ यांच्याकडे दिले. दिव्यांगांसाठी बच्चू कडू यांनी रस्त्यावर लढा दिला. विधिमंडळात आवाज उठवला. प्रसंगी प्रशासनाशीही पंगा घेतला. दिव्यांग बांधवांच्या कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना धडा शिकवण्याचे धाडस देखील बच्चू कडू यांनीच दाखवले.

असा सुरु झाला दिव्यांगांसाठी लढा
15 वर्षांपूर्वी पुण्यात काही दिव्यांग बांधवांची आणि बच्चू कडू यांची भेट झाली. दिव्यांगांच्या व्यथा त्यांना त्यावेळी नव्याने कळल्या. सरकारदरबारी होत असलेली दिव्यांगांची ससेहोलपट, नियमांची होत नसलेली अंमलबजावणी आणि दिव्यांग बांधवांचे त्यामुळे होणारे हाल ऐकून बच्चू कडू यांनी त्यांच्यासाठी आवाज उचलण्याचा निर्णय घेतला तेंव्हापासून हा लढा अविरतपणे सुरु आहे. बच्चू कडू यांनी दिव्यांग बांधवांसाठी सुरु केलेले “देहू ते वर्षा” आंदोलन हे दिव्यांग बांधवांच्या लढ्याची ठिणगी ठरली आणि बघता बघता या ठिणगीचे वणव्यात रूपांतर झाले. राज्यभरातील दिव्यांग बांधव “प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या” झेंड्याखाली एकवटले. दिव्यांग बांधवांनी प्रहार संघटनेला नेतृत्व दिले. पंतप्रधान कार्यालयासमोर आंदोलन, महाराष्ट्र सदन ताब्यात घेणे, सामाजिक न्यायमंत्र्यांच्या घराचा ताबा, आझाद मैदानावर डेरा अशी अनेक आंदोलने बच्चू कडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. बच्चू कडू यांचा आवाज देशभरात घुमला.

अपंग बांधवांसाठी मंत्रीपदावर लाथ
विविध प्रवर्गांसाठी जशी मंत्रालय असतात तसेच दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र मंत्रालय हवे यासाठी त्यांनी पाठपुरावा सुरू केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात बच्चू कडू यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले. दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची मागणी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. पण ठाकरे यांच्याकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. संतप्त झालेल्या बच्चू कडू यांनी मंत्रीपदावर लाथ मारून एकनाथ शिंदे यांना साथ दिली. दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची मागणी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आणि शिंदे यांनीही ती मान्य केली आणि दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र मंत्रालय असलेले महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले.

बच्चूभाऊंची गाजलेले आंदोलने
मंत्र्यांच्या वाहनांवर काळ्या रंगाचे पट्टे मारण्याचे आंदोलन, अचलपूर जिल्हानिर्मितीच्या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन, संडास योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्या पंचायतराज समितीला सडलेले संडासच्या भांडे भेट देण्याचे आंदोलन, शाळकरी जीवनातील सुतळी बॉम्ब आंदोलन, मंत्र्याच्या घरी जाऊन त्याचे कान पकडून च्यावम्याव आंदोलन, राज्यातील मंत्र्यांचे मुखवटे लावून आंदोलन, इत्यादी विविध अभिनव आंदोलने केली आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---