अट्टल दुचाकी चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या हाती !

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ फेब्रुवारी २०२३ । अट्टल दुचाकी चोरट्याच्या जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोपडा शहरातील बसस्थानक परीसरातून गुरूवारी मुसक्या बांधल्या आहेत. आरोपीने चोपडा आणि अमळनेर तालुक्यात दुचाकी चोरींची कबुली देत तीन दुचाकी काढून दिल्या आहेत. अधिक कारवाईसाठी संशयीताला चोपडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. राजेश श्रीराम बारेला (22, मोहन पडवा, ता.वरला, जि.बडवाणी, मध्यप्रदेश) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
चोपडा शहरातून दोन आणि अमळनेर शहरातून एक अश्या तीन दुचाकी चोरीतील संशयित आरोपी हा चोपडा शहरातील बसस्थानकात आल्याची माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना कळाल्यानंतर त्यांनी कारवाईच्या सुचना दिल्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील हवालदार संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, परेश महाजन, दीपक शिंदे, प्रमोद ठाकूर यांनी गुरूवारी दुपारी दोन वाजता सापळा रचून संशयित आरोपी राजेश श्रीराम बारेला याला चोरीच्या दुचाकीसह अटक केली. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने चोपडा शहरातून दोन आणि अमळनेर शहरातून एक अश्या तीन दुचाकी चोरीची कबुली दिली आहे. पुढील कारवाईसाठी त्याला चोपडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.