जळगाव लाईव्ह न्यूज । रावेर तालुक्यातील गोलवाडे गावात घराजवळ बांधलेली बकरी बिबट्याने फस्त केली असून यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, गावाजवळ राहणाऱ्या सुपडा झेंडू जैतकर यांच्या घराजवळ बांधलेली बकरी बिबट्याने फस्त केली. गावात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून गावकऱ्यांनी वन विभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
वनपाल रविंद्र सोनवणे यांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले व बिबट्याचे पगमार्ग घेतले. त्यांनी ग्रामस्थांना सावध राहण्याचे आणि रात्री एकटे शेतात न जाण्याचे आवाहन केले आहे. गोलवाडे गावात बिबट्याचा वाढता वावर लक्षात घेता वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.