जळगाव लाईव्ह न्यूज । देशात डिजिटल पेमेंटचा (Digital Payment) वापर वाढत असला तरी, अनेकदा कॅशची (Cash) गरज भासते. बहुतांश लोक कॅशसाठी एटीएमचा (ATM) वापर करतात. मात्र यातच आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) एक महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे ज्यामुळे बँकेच्या ग्राहकांना झटका बसणार आहे. बँक एटीएममधून रोख रक्कम काढण्याचे शुल्क वाढवण्याची शक्यता आहे.

सध्या, RBI नियमानुसार महिन्यात ५ वेळा एटीएममधून कॅश काढण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. परंतु, या मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार करण्यासाठी ग्राहकांना आता जास्त शुल्क भरावे लागू शकते. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने असे सुचवले आहे की पाचवेळा एटीएममधून पैसे काढल्यानंतर प्रत्येक कॅश विड्रॉवलसाठी शुल्क २१ रुपयांवरून २२ रुपये करण्यात यावे.
एटीएम इंटरचेंज फी वाढ
एटीएम इंटरचेंज फी ही एक अशी फी आहे जी एका बँक दुसऱ्या बँकेला एटीएम सेवेचा वापर करण्यासाठी देते. या फीमध्ये देखील वाढ करण्यात येणार आहे. सध्या रोख व्यवहारासाठी ही फी १७ रुपये आहे, परंतु ही फी १९ रुपये करण्याची शिफारस NPCI ने केली आहे. त्याचप्रमाणे, नॉन-कॅश व्यवहारासाठी ही फी ६ रुपयांवरून ७ रुपये करण्यात येणार आहे.
बँक आणि व्हाइल लेबल एटीएम ऑपरेटर्सची सहमती
बँक आणि व्हाइल लेबल एटीएम ऑपरेटर मेट्रो आणि नॉन मेट्रो शहरात शुल्क वाढवण्याच्या माताशी सहमत आहेत. वाढती महागाई, ट्रान्सपोर्टेशन खर्च आणि कॅश रिप्लेनिशमेंटसाठीचा खर्च वाढत आहे, यामुळे हे शुल्क वाढवण्याची मागणी केली जात आहे.
RBI ची अधिकृत माहिती नाही
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि NPCI ने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. हे बदल लागू झाल्यास, बँक ग्राहकांना एटीएममधून पैसे काढण्यासाठी जास्त पैसे द्यावे लागतील.