जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२४ । मे महिन्यात महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात उन्हाचा प्रकोप पाहायला मिळाला. प्रचंड उष्णता वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. उन्हाच्या चटक्यापासून दिलासा मिळाला यासाठी मान्सूनची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. अखेर यंदा वेळेपूर्वीच मान्सून केरळात धडकला असून आता महाराष्ट्रातही मान्सून लवकरच दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, मान्सून केरळमध्ये धडकताच महाराष्ट्रातील वातावरणात मोठा बदल आहे.
गुरुवारी (ता. ३०) मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर राज्यातील वातावरणात मोठा बदल झाला आहे. अनेक भागात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. तापमानात काहीशी घट झाली झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे. येत्या २४ तासांत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वीची कामे आटोपून घ्यावी असा सल्लाही देण्यात आला आहे.
भारतीय हवामान खात्याने आज शुक्रवार आणि उद्या शनिवारी मुंबईसह उपनगरात हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाचा अंदाज आहे. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातही २ जूननंतर मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज वर्तविला आहे. यामुळे जळगावकरांना उकाड्यापासून दिलासा मिळेल
महाराष्ट्रात मान्सून कधी होणार दाखल?
मौसमी वारे दरवर्षी केरळात १ जून ते ३ जून या कालावधीत दाखल होत असतात. त्यानंतर १० ते १२ दिवसांनंतर मुंबईसह संपूर्ण राज्याला मौसमी वारे व्यापतात. यंदा ३० मे रोजीच मान्सून केरळात दाखल झाला. त्यामुळे राज्यात ५ किंवा ६ जूनपर्यंत मान्सून दाखल होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.