जळगाव लाईव्ह न्यूज । मनपा विशेष । शहरात अमृत योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून अनेक भागामध्ये अमृत योजनेच्या टेस्टींग सुरु आहेत. पावसाळ्यापुर्वी शहरातील शक्य तेव्हढे रस्ते मार्गी लावण्यासाठी आता प्रशासन व नगरसेवकांची धडपळ सुरु झाली असून मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी ज्या रस्त्यांची कामे सुरु होणार आहेत, अशा रस्त्यांवरील अमृत योजनेच्या पाईपलाईन व नळ कनेक्शन देऊन तातडीने मार्ग मोकळा करण्याच्या सुचना पाणी पुरवठा विभागाला दिल्या आहेत.
त्यानुसार पाणी पुरवठा विभागाकडून बेंडाळे चौक ते इंच्छादेवी चौक, गणेश कॉलनी ते कोर्ट चौक टॉवर, चौक ते नेरी नाका स्मशानभूमिपर्यंतच्या रस्त्यांवरील नळकनेक्शसह पाईपलाईनचे काम मार्गी लावण्यात येत आहे. तसेच शहरातील इतर भागातील सुटलेले नळ कनेक्शन देखील तत्काळ देण्यात येत असून ज्यांचे नळ कनेक्शन बाकी असतील त्यांनी मनपाकडे अर्ज करावा असे आवाहन केले आहे.
नळ कनेक्शन देण्याचे काम युध्दपातळीवर
यापुर्वी देखील महापालिकेने वृत्तपत्रांच्या माध्यमातून नागरिकांना नळ कनेक्शन घेण्याचे आवाहन केले होते. जे मालमत्ता धारक रस्त्याचे काम सुरु होण्या आधी नळ कनेक्शन घेणार नाहीत, त्यांना नंतर नळ कनेक्शनसाठी जास्तीची आकारणी करण्यात येईल व होणाऱ्या आर्थिक नुकसानीला संबधित मालमत्ताधारकच जबाबदार राहिल असा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे शहरातील १२०० नागरिकांनी नळ कनेक्शन मिळावे यासाठी मनपाकडे अर्ज केले असून आलेल्या अर्जांप्रमाणे संबधित मालमत्ताधारकांना नळ कनेक्शन देण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.
रस्त्यांचा मार्ग मोकळा करा : आयुक्त
शहरातील प्रभाग क्रमांक १२ मधील नगरसेवक अनंत जोशी व नितीन बरडे यांनी आपल्या प्रभागातील ९ कॉलन्यामधील रस्त्यांची कामे मंजुर असतांना अमृत योजनेचे काम अपुर्ण असल्यामुळे करता येत नसल्याची तक्रार केली होती. त्यानंतर शुक्रवारी नगरसेवक नितीन लढ्ढा, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नितीन बरडे, अनंत जोशी यांनी मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची भेट घेऊन सदर विषय मांडला असता आयुक्त गायकवाड यांनी पाणी पुरवठा विभागाला प्रभाग १२ मधील अमृतचे संपुर्ण काम लवकरात लवकर करुन रस्त्यांच्या कामांचा मार्ग मोकळा करण्याच्या सुचना दिल्या.
टॉवर ते ममुराबाद पूलापर्यंत अमृतचे काम पुर्ण
स्वातंत्र चौक ते नेरी नाका, टॉवर चौक ते भिलपुरा चौक व तेथून ममुराबाद पूला पर्यंतचे अमृतचे काम शंभर टक्के पुर्ण झाले असून रस्ता तयार करण्यासाठी कुठलीही अडचण नसल्याची माहिती पाणी पुरवठा अभियंता गोपाल लुल्ले यांनी दिली. तसेच पुष्पलता बेंडाळे चौक ते इंच्छादेवी चौक, गणेश कॉलनी ते कोर्ट चौक टॉवर, चौक ते नेरी नाका स्मशानभूमिपर्यंतच्या रस्त्यांवरील नळकनेक्शसह पाईपलाईनचे काम मार्गी लावण्यात येत असल्याचे देखील त्यांनी सांगितले.