⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

जळगावात राबवला जाणार अंबरनाथ पॅटर्न : शहरातील सगळे रस्ते होणार काँक्रिटचे?

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ सप्टेंबर २०२२ । जळगाव शहराच्या विकासाच्या दृष्टीने आणि शहरातील नागरिकांना होत असणाऱ्या त्रासाच्या दृष्टीने जळगाव शहरात चांगले रस्ते होणे अतिशय महत्त्वाची बाब बनली आहे. यातच जळगाव शहरातील सर्व रस्ते हे काँक्रिटचे करावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उत्सुक असून त्यांनी याबाबत लवकरच बैठक बोलवली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नुकतेच जळगाव जिल्हा दौऱ्यावर येऊन गेले. यावेळी दौरा संपल्यावर एअरपोर्टवर मुख्यमंत्र्यांची व स्थानिक आमदारांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आमदार राजूमामा भोळे यांनी जळगाव शहरातल्या रस्त्यांसंदर्भात माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण जळगाव शहराचे रस्ते हे सिमेंट काँक्रिटचे बनवावेत असे सुचवले. कारण अंबरनाथ मध्ये अशाच प्रकारचे काँक्रिटीकरण करण्यात आले होते. अंबरनाथचे तत्कालीन नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी अंबरनाथ मध्ये सर्व रस्ते हे काँक्रीटचे बनवले होते. तश्याच प्रकारचे काम जळगाव शहरातही व्हावे असे शिंदे यांनी सुचवले.

मात्र संपूर्ण जळगाव शहराचे रस्ते हे सिमेंट काँक्रीटचे करायचे असतील तर कमीत कमी आठशे ते हजार कोटी रुपये इतका खर्च येईल असे यावेळी जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी सांगितले. यावर लवकरच बैठक घेण्यात येणार आहे.

याबाबत जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, जळगाव शहरासाठी जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. जळगाव शहरात कित्येक ठिकाणी भुयारी गटारांची व इतर काम सुरू आहेत. यामुळे ज्या ठिकाणी हि कामे सुरु आहेत त्या ठिकाणी हे रस्ते बनणे शक्य नाही.मात्र बाकी सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे करावे आणि जळगाव शहरासाठी जास्तीत जास्त निधी आणावा याकडे माझा कल आहे. यामुळे किती निधी मिळेल. यापेक्षा जास्तीत जास्त निधी आणायचा नक्की प्रयत्न करणार आहे. जेणेकरून जळगाव शहरातले रस्ते चांगले होतील.

तर दुसरीकडे याबाबत अंबरनाथचे तत्कालीन नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, अंबरनाथ मध्ये ज्या प्रकारचा पॅटर्न राबविण्यात आला त्याला शिंदे पॅटर्न म्हणता येईल. कारण खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दूरदृष्टीमुळे अंबरनाथ मध्ये रस्ते कॉंक्रिटीकरण शक्य झालं. जळगाव शहराबद्दल माझ्या मनात अतिशय प्रेम आहे. मी स्वतः जळगावकर असल्यामुळे मुख्यमंत्री जळगाव दौऱ्यावर असताना मंत्री गुलाबराव पाटील व मंत्री गिरीश महाजन आणि आमदार राजूमामा भोळे यांच्याशी चर्चा करत असताना जळगावतही हा पॅटर्न राबवावा याबाबत बातचीत झाली. यामुळे जळगाव शहरातही असाच शिंदे पॅटर्न राबवण्यात येईल यात काही शंका नाही.