जळगाव लाईव्ह न्यूज । चोपडा शहरातील नारायणवाडी परिसरातील धरणगाव नाक्याजवळ एका ४५ वर्षीय प्रौढाचा दगडाने ठेचून खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रदीप राजू माळी (वय ४५, रा. तारामतीनगर, चोपडा) असे मृत व्यक्तीचे नाव असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे

नेमकी घटना काय?
सोमवारी सकाळी धरणगाव नाक्याजवळ एक मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली. घटनेची भीषणता पाहता, मृताचा चेहरा दगडाने पूर्णपणे ठेचून विद्रूप करण्यात आला होता, जेणेकरून त्याची ओळख पटू नये.

लग्नपत्रिकेने मिळवून दिला पत्ता
सुरुवातीला मृताची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, मृतदेहाची झडती घेतली असता त्यांच्या खिशात एक लग्नपत्रिका आढळली. या पत्रिकेवरील माहितीच्या आधारे पोलिसांनी शोध घेतला असता, मृत व्यक्ती प्रदीप माळी असल्याचे निष्पन्न झाले.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तपासात तांत्रिक मदत मिळवण्यासाठी जळगाव येथून फॉरेन्सिक (न्यायवैद्यक) टीमला पाचारण करण्यात आले होते. या पथकाने घटनास्थळावरून रक्ताचे नमुने आणि इतर महत्त्वाचे पुरावे संकलित केले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी तातडीने तपास करत एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आलीय हा खून जुन्या वादातून झाला की अन्य काही कारणातून, याचा तपास पोलीस करत आहेत. भरवस्तीत झालेल्या या निर्घृण हत्याकांडाने चोपडा शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.











