⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

अडावद शिक्षक भरती : तिघांना जामीन तर ११ जणांचा जामीन फेटाळला

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२२ । संस्थाध्यक्षांची बनावट स्वाक्षरी करून शिक्षक भरती केल्याप्रकरणी अडावद येथील सार्वजनिक विद्यालयाच्या निवृत्त मुख्याध्यापिका, मुख्याध्यापक व विद्यमान मुख्याध्यापकांसह १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्यात संशयितांनी अमळनेर सेशन कोर्टात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने ११ जणांचा जामीन फेटाळला असून केवळ तिघांना जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अडावद परिसर शिक्षण संस्थेचे सचिव बाळासाहेब चिंतामण देशमुख यांनी प्रोसिडिंग बुकमध्ये अध्यक्षांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून धर्मदाय आयुक्तांच्या कार्यालयात फेरफार अर्ज दाखल केले. जिजाबराव यादवराव देशमुख यांना अध्यक्ष भासवून शिक्षक भरती प्रस्तावांवर अध्यक्षांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून सहा शिक्षकांची भरती केली. बनावट दस्तऐवजांच्या आधारावर शिक्षक मान्यता घेऊन शिक्षकांचे वेतनही काढले. हा प्रकार संस्थेचे अध्यक्ष महेंद्र देशमुख यांना लक्षात आला. त्यामुळे देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अडावद पोलिस ठाण्यात १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणात संशयितांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायाधीश एस. बी. गायधनी यांनी बाळासाहेब देशमुख, निवृत्त मुख्यध्यापिका मीना देशमुख, जिजाबराव देशमुख, रतिलाल राजकुळे, शांताराम कोळी, संदीप पाटील, रामकृष्ण पाटील, मनोज देशमुख, नंदकुमार देशमुख, विजय कोळी, निवृत्त मुख्याध्यापक सुभाष पाटील यांचा जामीन न्यायाालयाने फेटाळला आहे. तर ३ जणांचा जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे चाेपडा तालुक्यासह जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

यांना मिळाला जामीन

या प्रकरणात शांताराम गवळे, प्रमोद देशमुख, मुख्याध्यापक अशोक कदम यांना प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला आहे. दरम्यान, ११ जणांना जामीन नाकारल्याने खळबळ उडाली आहे. संशयितांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर संशयितांना अटक करण्यासाठी पोलिसांनी पथक रवाना केले आहे.