धक्कादायक ! अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, रुग्णालयात दाखल
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जानेवारी २०२५ । मुंबईच्या (Mumbai) वांद्रे येथे बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याच्यावर मध्यरात्री एक अज्ञात चोराने चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात सैफ अली खान गंभीर जखमी झाला आहेत. मध्यरात्री अडीच ते तीन वाजण्याच्या दरम्यान, सैफ अली खान यांच्या निवासस्थानी चोराने प्रवेश केला होता.
चोराने सैफ अली खान यांच्या रुमच्या बाल्कनीमधून प्रवेश केला होता. घरातील कर्मचारी आणि इतर व्यक्तींनी चोराला पाहून आरडाओरड केली, ज्यामुळे घरातील सर्वांना जाग आली. सैफ अली खान तातडीनं उठून रुममधून बाहेर येत होता, तेव्हा चोर आणि सैफ आमने-सामने आले. चोराने हातातल्या धारदार शस्त्राने सैफ अली खानवर सपासप वार केले, ज्यामुळे त्याला शरीरावर सहा ठिकाणी जखमा झाल्या आहेत.
सैफ अली खान याच्या मानेवर, हातावर आणि पाठीवर चोराकडून वार करण्यात आले. यामध्ये सैफ अली खान गंभीर जखमी झाला. त्याच्यावर लिलावती रूग्णालयात उपचार सुरू आहेत. शस्त्रक्रिया झाल्याचे समजतेय. सध्या सैफ अली खान यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, या प्रकरणी वांद्रे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. चोराच्या हल्ल्यामध्ये एक कर्मचारी जखमी झाल्याचे समजते. पोलिसांकडून कर्मचाऱ्यांचे फोन ताब्यात घेतले आहेत आणि तीन कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. ज्यावेळी हल्ला झाला, त्यावेळी कर्मचारी काय करत होते याबाबतची माहिती घेतली जात आहे.