जळगाव लाईव्ह न्यूज । महामार्ग क्रॉस करणाऱ्या कार चालकाला शिवीगाळ करून त्याच्या कारचे मोबाइलमध्ये फोटो घेऊन पोलिस असल्याचे भासवणा-या तोतया पोलिसाविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा तोतया पोलिस बांभोरी गावाचा तलाठी होता, तो आता सर्कल असून ‘सिंघम आप्पा’ नावाने ओळखला जातो. त्याच्या विरुद्ध पोलिसांनी चॉप्टरची कारवाई केली आहे.

भाजपचे कार्यकर्ते जयेश खुमानसिंग ठाकूर (रा. व्यंकटेश कॉलनी) हे सुकृती अपार्टमेंटमधून कारने (क्र. एमएच- १९, सीव्ही ७७७७) महामार्ग ओलांडत असताना त्यांच्या समोरून बुलेटवरील (क्र. एमएच- १९, सीके- ५७४७) हातात पोलिसांची काठी, अंगात खाकी रंगाची पॅन्ट असलेला चालकाने शिवीगाळ केली व कारचे फोटो काढले. त्यानंतर जयेश ठाकूर हे कारमधून खाली उतरून त्यांनीही त्यांचा फोटो काढला व स्वतःची ओळख दिल्यावर तोतया पोलिस बुलेट घेऊन निघून गेला.
या प्रकरणी ठाकूर यांनी तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर बुलेटच्या क्रमांकावरून माहिती काढली असता बुलेटस्वार शिवराम बाविस्कर असून ते गावाचे तलाठी होते.