चालत्या रेल्वेतून उतरणे महागात पडले, तरुणाने गमावले पाय; जळगाव स्थानकावरील घटना
जळगाव लाईव्ह न्यूज । 5 मार्च 2024 । जळगाव रेल्वे स्थानकावरून एक दुर्दैवी घटना समोर आलीय. लग्न सोहळा आटोपून गावाकडे परतत असताना चुकीच्या रेल्वेत बसल्याचे लक्षात आले आणि चालत्या रेल्वेतून उतरताना तरुण रेल्वेखाली ओढला गेला. यात त्याचे दोन्ही पाय कापले गेल्याची घटना ३ मार्च रोजी रात्री घडली. मुकेश मुरलीधर मस्के (रा. तुमसर रोड, जि. भंडारा) असं या तरुणाचे नाव असून त्याला लोहमार्ग पोलिसांनी गंभीर जखमी अवस्थेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.
मुकेश मस्के हा तरुण मित्रासह जळगाव येथे लग्नासाठी आला होता. लग्न आटोपल्यावर परत तुमसर रोड येथे जाण्यासाठी रात्री तो जळगाव रेल्वेस्थानकावर आला. त्यावेळी विदर्भ एक्स्प्रेस समजून तो नाशिक-अमरावती एक्स्प्रेसमध्ये बसला. त्यामुळे तो चालत्या रेल्वेतून प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर खाली उतरण्याचा प्रयत्न केला. प्लॅटफॉर्मवर त्याने उडी तर मारली मात्र एक हात रेल्वे डब्याच्या दांडीला पकडलेल्या अवस्थेत राहिल्याने तो गाडीखाली ओढला गेला.
ही रेल्वे प्लॅटफॉर्मवरून पूर्ण पुढे निघून गेल्यानंतर स्थानकावरील प्रवाशांनी तसेच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तरुणाचे दोन्ही पाय कापले जाऊन तो प्लॅटफॉर्म व रेल्वे रुळाच्यामध्ये रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला दिसला. त्याच्या एका पायाचा तुकडा दोन्ही रेल्वे रुळांच्या मध्ये पडलेला होता.
गंभीर जखमी झालेल्या तरुणाला लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पोहेकॉ सचिन भावसार व पोकों किशोर पाटील यांनी रिक्षाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. रेल्वे पोलिसांनी रुग्णवाहिकेची प्रतीक्षा न करता तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केल्याने या तरुणाचे प्राण वाचण्यास मदत झाली.