अत्यंत दुर्दैवी ! कारची दुचाकी धडक, गर्भवती महिलेचा जागीच मृत्यू
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२४ । भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्यामुळे रस्त्यावर फेकल्या गेलेल्या गर्भवती महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना महामार्गावरील वराड गावानजीक घडली. तर या दुर्घटनेत महिलेच्या पतीसह चार वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. दीपाली योगेश कोळी (वय २२) असे अपघातात मृत झालेल्या महिलेचे नाव आहे.
दीपाली कोळी व पती योगेश गुलाब कोळी (वय २८) हे मुलीसह एरंडोल येथे नातेवाइकांना भेटण्यासाठी रविवारी सकाळी गेले होते. नातेवाईकांची भेट घेतल्यानंतर दुपारी ते घरी येण्यासाठी निघाले. वराड येथे आले असता मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. मागून धडक बसल्याने दुचाकीवरील तिघेजण महामार्गावर फेकले गेले. यात दीपाली कोळी या आठ महिन्याची गर्भवती होत्या. त्या रस्त्यावर फेकल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात पत्नीचा मृत्यू झाला असून दीपाली यांचे पती योगेश व चार वर्षाची मुलगी काव्या हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सर्वांना जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात रवाना केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर जखमींना जळगावच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.