बुधवार, नोव्हेंबर 29, 2023

पेरण्या खोळंबल्याने अन्नधान्याच्या किंमती आणखी महागणार?

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२३ । राज्यासह जळगावात मान्सून लांबल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान, मान्सून लांबणीचा परिणाम अन्नधान्याच्या किंमतीवर होण्याची शक्यता आहे. अन्नधान्याच्या किंमतीत आणखी वाढ होण्याची भीती आहे.

मान्सून पावसाने अद्यापही दमदार हजेरी न लावल्याने पुढचे दिवस कसे राहतील याची चिंता शेतकरी करू लागला आहे. दुसरीकडे आता बाजारपेठेत व्यापारी वर्गाच्या चेहऱ्यावर देखील तणाव दिसत आहे. कारण जिल्ह्याचे अर्थकारण ७० टक्के शेतीवर अवलंबून आहे.

मान्सून लांबल्याने पेरणी होण्यापासून ते पीक हातात येण्यापर्यंतचे नियोजन विस्कळीत झाल्यास त्याचा परिणाम ग्राहकांवर होणार आहे.त्यांच्याकडून मागणी राहील पण शेतातून पीक निघालेले नसेल किंवा कमी असेल, अशी स्थिती उद्भवू शकते. यामुळे अन्नधान्याचे दर वाढतील.

जळगावात गहू-तांदळाचे दर काय?
लोकवन गेहू – 2700 ते 2800 क्विंटल
शरबती गेहू – 2800 ते 3000 क्विंटल
ज्वारी – 3000 ते 3500 क्विंटल
बाजरी – 3000 ते 3200 क्विंटल
कालीमूछ तांदूळ – 5200 ते 5500 क्विंटल
कोलम तांदूळ – 5600 ते 5800 क्विंटल
बासमती – 11,000 ते 12,000 क्विंटल

दरम्यान, केंद्र सरकार डाळींच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, मात्र असे असतानाही तूर डाळ स्वस्त होण्याऐवजी महाग होत आहे. गेल्या दोन महिन्यांत डाळीच्या दरात 15 ते 25 रुपयांची वाढ झाली आहे. आता एक किलो डाळीचा भाव 160 रुपयांवरून 170 रुपये झाला आहे. अशा स्थितीत सर्वसामान्यांच्या ताटातून डाळ गायब झाली आहे.