एटीएममध्ये मदतीच्या बहाण्याने कार्ड बदलून लूट करणारी ठाण्यातील टोळी पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव लाईव्ह न्यूज | २७ जानेवारी २०२३ | राज्यभरात 12 हून अधिक गुन्हे दाखल असलेल्या ठाण्यातील टोळीला शिरपूर तालुका पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी एटीएम सेंटरमध्ये मदत करण्याच्या बहाण्याने कार्ड बदलून पैसे काढून फसवणूक करीत होते. आरोपींकडून विविध बँकांचे 94 एटीएम, कार्ड, मोबाईलसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
मुंबई-आग्रा महामार्गावर शेतकरी सहकारी साखर कारखाना परिसरामध्ये काही संशयीत इसम मुंबई पासींगच्या वाहनाने संशयीतरित्या फिरत असल्याची खात्रीशिर माहिती काल शुक्रवार, 26 रोजी एपीआय सुरेश शिरसाठ यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने दहिवद गावाकडे जावून संशयीत इसम व वाहनाचा शोध सुरु केला. साखर कारखान्याजवळ एम.एच.02 बी.झेड 3439 गाडी व त्यात चार जण मिळून आले. त्यांना त्यांचे नांव गाव विचारून त्यांचेकडे चौकशी केल्यानंतर ते ठाणे जिल्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले. वाहनात 94 एटीएम कार्ड मिळून आले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, प्रभारी उपविभागीय अधिकारी अन्साराम आगारकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपुर तालुका पोलीस ठाण्याचे एपीआय सुरेश शिरसाठ भिकाजी पाटील, संदीप पाटील, पाटील, संतोष पाटील, जयेश मोरे, इसरार फारुकी, योगेश मोरे, मुकेश पावरा तसेच महामार्ग सुरक्षा पथकातील प्रशांत देशमुख, देवेंद्र वेधे यांनी केली.