सातपुड्यात आढळला वैशिष्ट्यपूर्ण लालसर रंगाचा विंचू, अमेरिकेच्या विद्यापीठात शोधनिबंध सादर
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ फेब्रुवारी २०२२ । सातपुड्याच्या पायथ्याची असलेल्या यावल तालुक्यातील वाघाझिरा व खिरोदा येथे ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या तीन संशोधकांना लालसर तांबड्या रंगाचा वैशिष्ट्यपूर्ण विंचूची नवीन प्रजाती आढळून आली आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा प्रकारचा विंचू आढळला असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे.
जळगावचा विवेक वाघे, सोलापूरचा सत्पाल गंगलमाले व सांगलीचा अक्षय खांडेकर या तिन्ही संशोधकांनी सातपुड्याच्या पायथ्याशी संशोधन केले असता त्यांना विंचूची ही नवीन प्रजाती ऑक्टोबर २०२० मध्ये आढळून आली. साधारण वर्षभर त्यावर संशोधन केल्यानंतर ही प्रजाती वेगळी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर अमेरिकेच्या मार्शल युनिव्हर्सिटीत त्यांनी याबाबतचा शोधनिबंध सादर केला.
सातपुडा पर्वतावरून नाव ठेवले ‘कॉमसोबुथस सातपुराएनसीस‘
विवेक वाघे यांनी सांगितले की, नवीन प्रजाती ही बुथीडी कुळातल्या कॉमसोबुथस या जातीमधील आहे. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी ही आढळली म्हणून तिचे नामकरण कॉमसोबुथस सातपुराएनसीस (Compsobuthus satpuraensis) असे करण्यात आले आहे. जगभरात कॉमसोबुथस या जातीच्या ५० प्रजाती आढळून येतात. भारतीय उपखंडातील ही सहावी, भारतातील चौथी तर महाराष्ट्रातील पहिली प्रजाती आहे, असे तिन्ही संशोधकांनी सांगितले.
पाल, विंचू, कोळी किड्यांवर संशोधन
देशभरात विंचूच्या साधारणत: १५० प्रजाती आढळून येतात, त्यापैकी जळगाव जिल्ह्यात सुमारे १० आढळतात. आता त्यात या वैशिष्ट्यपूर्ण एका प्रजातीच्या विंचूची भर पडली आहे. सध्या आम्ही विंचूसह पाल व कोळी किड्यांवर संशोधन करत आहे. विवेक वाघे, संशोधक, जळगाव
वैशिष्ट्यपूर्ण दाणेदार रचनेमुळे इतरांपेक्षा दिसतात वेगळे
या विंचूचा रंग लालसर तांबडा आहे. नेहमी आढळणाऱ्या विंचूच्या शेपटीचा रंग पिवळसर असतो, तर या विंचूची शेपटी लालसर आहे. वैशिष्ट्यपूर्ण दाणेदार रचना, पेक्टीनल टीथची संख्या, लांबी व रुंदी यांचे गुणोत्तर प्रमाण, शरीरावरील उठावामुळे ही प्रजाती इतर प्रजाती पेक्षा वेगळी ठरते. ही प्रजाती निशाचर असून ती माळराने, झुडपी जंगले, व पानगळीच्या जंगलांमध्ये दगडांच्या आडोशाने आढळून येते.
- मुंबई-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात अमळनेरच्या दाम्पत्याचा मृत्यू
- जळगावात शिंदे गटाने फिरवली भाकरी; जिल्हाप्रमुखपदी विष्णू भंगाळे यांची नियुक्ती !
- सावद्यात लाखो रुपयांचा अवैध गुटखा जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- रूद्राक्ष टीमचे कुटुंब नियोजन पथनाट्य ठरले प्रथम विजेते
- गोदावरी अभियांत्रिकीत उद्या स्वावलंबी भारत अभियानार्तंगत उद्यमिता संमेलन