Yawal : केळी बागेला आग, 4000 खोडे जळून खाक ; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२४ । यावल तालुक्यात तापमानाचा पारा ४७ अंशांवर पोहोचला असून यामुळे तीव्र उन्हाळ्याच्या झळा बसत आहे. तापमान वाढीचा मोठा फटका केळी बागांना देखील बसत असून केळी बागा वाचविण्यासाठी शेतकरी धडपडत आहे. मात्र यातच भालोद शिवारातील चिखली रस्त्यावर केळीच्या बागेला शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याने सुमारे चार हजार खोड जळून खाक झाले.यावल अग्निशमन दलाने अथक परिश्रम करून आग आटोक्यात आणली.
भालोद येथील शेतकरी उल्हास तुकाराम चौधरी यांच्या गट नंबर १,२७० ही जमीन एकनाथ रूपचंद इंगळे यांनी निम्म्या हिश्शाने केली आहे. त्यांनी पिलबाग व नवती अशी चार हजार खोड लावले होते. त्यांच्या शेतावरून वीज तारा गेल्या आहेत. या तारांना शॉर्टसर्किट होऊन शुक्रवारी दुपारी आग लागली. या आगीत सुमारे सुमारे चार हजार खोड जळून खाक झाले आहेत. तसेच ठिबक संच व पीव्हीसी पाइप जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
ही बाब काही शेतकऱ्यांच्या लक्षात येताच वार्ता वाऱ्यासारखी पसरली. अनेक शेतकऱ्यांनी शेताकडे धाव घेतली. आग मोठी असल्याने आग आटोक्यात आली नाही. यामुळे यावल नगरपरिषदेला माहिती देण्यात आली. यानंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. कर्मचारी शिवाजी पवार कल्पेश बारी यांच्या टीमने अथक परिश्रम करून आग आटोक्यात आणली