दुर्दैवी! प्रसूतीनंतर बाळ दगावलं, नंतर दोन दिवसांनी मातेचाही मृत्यू
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२४ । प्रसूतीनंतर बाळ दगावून दोन दिवस होत नाही तोच श्रद्धा जयेश सूनसोतकर (२८, रा. पहूर कसबे, ता. जामनेर) या मातेचाही सोमवारी मृत्यू झाला. खासगी डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे माय-लेकाचा मृत्यू झाल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.
महिलेचे सासरे राजेश भीमराव सूनसोतकर यांनी सांगितले की, श्रध्दा सूनसोतकर ही गर्भवती होती. तिला ४ जून प्रसूती तारीख दिली होती. शनिवार, १८ मे रोजी तिला उपचारासाठी तारा हॉस्पिटल येथे तिचे पती जयेश यांनी नेले. नातेवाइकांना पूर्वसूचना न देता तिची दुपारी २ वाजता सोनोग्राफी केली. त्यानंतर तिला अॅडमिट करण्याचे सांगितले.
त्यानुसार तिला दाखल केले. दुपारी २:१५ वाजता विवाहितेचे सीझर केले. तिने मुलाला जन्म दिला. नाळ कापल्यानंतर बाळाला श्वास घेता येत नव्हता. त्यात त्याचा मृत्यू झाला. मात्र बाळाच्या आईची प्रकृती ठीक असल्याचे रुग्णालयाच्यावतीने सांगण्यात आले. उपचारात दोन-तीन दिवसात ती चांगली होईल, असेही डॉक्टरांनी सांगितले. सोमवारी मध्यरात्री २ वाजता महिलेची प्रकृती खालावली व डॉक्टरांनी पहाटे ४ वाजता अन्य ठिकाणी महिलेस दाखल करण्याचे सांगितले. त्यानुसार रविवारी पहाटे पाच वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी उपचाराला मरिलेकटन प्रतिसाद मिलन नसल्याचे लक्षात आल्याने महिलेस छत्रपती संभाजीनगर येथे घाटी रुग्णालयात दाखल करण्याचे सांगण्यात आले.
नातेवाइकांनी जवळच दुसऱ्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले. सोमवार, २० रोजी सकाळी ८:३० वाजता महिलेचा मृत्यू झाला. यावेळी कुटुंबीयांनी आक्रोश केला. पुढील कार्यवाहीसाठी महिलेचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला असता या ठिकाणी तारा हॉस्पिटलच्या निष्काळजीपणाबद्दल नातेवाइकांनी संताप व्यक्त केला