विधानभवनात जाऊनच सुटू शकतील शिक्षकांच्या अडचणी : अॅड महेंद्र भावसार
जळगाव लाईव्ह न्यूज | १६ मे २०२४ । न्यायालयात प्रॅक्टिस करीत असताना शिक्षकांच्या कायद्यामध्ये अनेक दुरुस्ती आवश्यक आहे, आणि कोणत्या कलमात कोणती दुरुस्ती केल्यामुळे शिक्षकांना न्याय देणे सुलभ होईल याचा अभ्यास करून त्याचा एक प्रबंध मी सुमारे चार वर्षांपूर्वी शासनाकडे सादर केला होता. परंतु त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. या कायद्यात अनेक दुरुस्त्या करणे आवश्यक आहे. आणि कायद्यातील दुरुस्ती ही विधानभवनात होते म्हणून मी स्वतः विधान भवनात जाऊन या कायद्यात मूलभूत बदल करण्यासाठी यशस्वी भूमका बजावू शकतो याची मला खात्री असून शिक्षकांच्या अशा अनेक अडचणी असून त्या सोडविण्यासाठी विधानभवनात जाणे आवश्यक असल्याने मी निवडणुकीच्या मैदानात उतरलो असल्याची माहिती अॅड.महेंद्र भावसार यांनी दिली.
गेली ३५ वर्षापासून मी धुळे, जळगाव, नंदुरबार, आणि नाशिक जिल्ह्यांचा समावेश असलेल्या नाशिक विभागात शैक्षणिक क्षेत्र आणि धर्मदाय आयुक्त एवढ्या मर्यादित विषयावर विधिज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करणारे अॅड.महेंद्र भावसार यांनी आगामी नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ नाशिकच्या निवडणुकीसाठी स्वतःची उमेदवारी जाहीर केलेली आहे. गुरुवारी ते जळगावात आले असता त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. पारस ललवाणी, अँड.पुरबे, आनंदा भोई, अभिजीत भांडारकर, दिलीप साळुंखे, प्रतापराव जावरे आदी उपस्थित होते.
अॅड.महेंद्र भावसार म्हणाले की, शिक्षक न्याय व हक्क परिषद या संघटनेमार्फत अनेक शिक्षकांच्या समस्या मी आतापर्यंत न्यायालयामार्फत तसेच आंदोलनाच्या माध्यमातून वेळोवेळी सोडविलेल्या आहेत. शिक्षकांसाठी असलेली जुनी पेन्शन योजना ही पूर्ववत त्यांना लागू करावी हा शिक्षकांसमोरचा महत्त्वाचा प्रश्न आहे. नुकत्याच झालेल्या टीईटी घोटाळा प्रकरणात सुमारे ८००० शिक्षकांना शासनाने अपात्र घोषित केले होते आणि परीक्षेत गैरप्रकार केला म्हणून या आठ हजार शिक्षकांकडे समाज देखील एका अपराधी भावनेने पाहत होता, अशा वेळेस या सर्व भेदरलेल्या शिक्षकांची एक व्यापक स्तरावर राज्य स्तरीय बैठक धुळे येथे घेतली आणि त्यांना दिलासा दिला. शिक्षकांवरील कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता अपात्र घोषित केलेले आहे. त्यामुळे आपण न्यायालयात लढा द्यावा, त्यानुसार आम्ही नामदार उच्च न्यायालयात या शिक्षकांच्या वतीने पिटीशन दाखल केले आणि त्वरित त्यांना स्टे मिळाला. ते शिक्षक आजही कामावर हजर आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
पुढे ते म्हणाले की, नुकताच काल झालेला शिक्षकांवरील अन्याय मला निदर्शनास आला. जळगाव जिल्ह्यातीलच जे शिक्षक बी.एल.ओ. म्हणून निवडणुकीसाठी कामकाज करतात त्या शिक्षकांना एखाद्या वेठबिगाराची पात्रता समजून त्यांच्याशी शासन वागणूक करते. बी.एल.ओ. शिक्षकांना वर्षभर सगळे निवडणुकीचे काम करून देखील १५० रुपये मानधन दिले जाते. ही शिक्षकांची थट्टा आहे आणि अनेक बी.एल.ओ. शिक्षकांना निवडणुकीची ड्युटी (कर्तव्य) करताना जेवण, चहा, नाश्ता काही मिळालेले नाही. त्यांनी स्वखर्चाने किंवा उपाशीपोटी हे कामकाज केले. एवढेच नव्हे तर त्यांना शासनाने दोन स्वयंसेवक नियुक्त करण्यास सांगितले या स्वयंसेवकांचे मानधन देखील दिले नाही. त्या १५० रुपयाच्या मानधनातून या स्वयंसेवकांना देखील मानधन द्यावे लागले, असा आरोप त्यांनी केला.
प्रामुख्याने सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्याबाबत काही मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत. त्यात केवळ सुट्टीच्या दिवशी शिक्षकांना अशा प्रकारचे कामे द्यावीत. अध्यापनाचे वेळेत किंवा वर्किंग अवर्समध्ये अशी कामे देऊ नयेत असे निर्देश असताना देखील या बी.एल.ओ. यांना सरसकट या कामात जुंपले गेले. त्यांचा देखील प्रश्न मी आता हाती घेतला आहे. संबंधित अधिकाऱ्यांना कंटेम् ऑफ कोर्टच्या नोटिसा आम्ही देणार आहोत, असे अॅड.महेंद्र भावसार हे म्हणाले.
शिक्षकांवर असलेला अशैक्षणिक कामाचा बोजा कमी करणे, असे अनेक प्रश्न शिक्षकांसमोर आहेत. मला गेल्या ३५ वर्षात प्रॅक्टिस केल्यानंतर या कायद्याचा सखोल अभ्यास झाल्यामुळे या समस्यांची मुळापासून जाण आहे. आणि त्यावरील उपाय देखील मला माहिती झाले आहेत. मला आत्मविश्वास आहे की मी या पदासाठी पात्र उमेदवार असून मी निश्चितच शिक्षकांवरील अन्यायाविरुद्ध आवाज उठवून न्याय मिळवून देण्यात समर्थ ठरेन. न्यायालयात प्रॅक्टिस करीत असताना शिक्षकांच्या कायद्यामध्ये अनेक दुरुस्ती आवश्यक आहे, आणि कोणत्या कलमात कोणती दुरुस्ती केल्यामुळे शिक्षकांना न्याय देणे सुलभ होईल याचा अभ्यास करून त्याचा एक प्रबंध मी सुमारे चार वर्षांपूर्वी शासनाकडे सादर केला होता. परंतु त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. या कायद्यात अनेक दुरुस्त्या करणे आवश्यक आहे. आणि कायद्यातील दुरुस्ती ही विधानभवनात होते म्हणून मी स्वतः विधान भवनात जाऊन या कायद्यात मूलभूत बदल करण्यासाठी यशस्वी भूमका बजावू शकतो याची मला खात्री आहे. यासाठीच मी शिक्षकांना आवाहन करतो की तुम्ही बुद्धिजीवी आहात, समाजाचे प्रतिनिधित्व करणारे विचारवंत आहात, एक पिढी घडविणारा शिक्षक असतो, त्याने त्याच्या स्वतःच्या समस्या सोडविणारा अभ्यासु उमेदवार, यालाच मतदान करावे अशी विनंती अॅड.महेंद्र भावसार यांनी केली आहे.