जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२४ । आज एक महत्वाचा सण आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. आजच्या या शुभमुहूर्तावर मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीची खरेदी केली जाते. मात्र, यंदा मोठ्या प्रमाणावर दर वाढून सोने जीएसटीसह ७४ हजारांपर्यंत पोहोचले होते. तर चांदीचा दर ८५ हजार रुपयांवर पोहोचला आहे. यामुळे यंदा अक्षय्य तृतीयेला सोने खरेदीसाठी अपेक्षित गर्दी होणार नसल्याचा अंदाज सराफ व्यावसायिकांकडून बांधला जात आहे.गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र, आज अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सोन्याच्या दरात थोडीशी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यात सोन्याच्या किमतींनी नवीन विक्रमी उच्चांकावर मुसंडी मारली. सोन्याच्या खरेदीला संपूर्ण भारतात विशेष महत्तव आहे विशेषतः लग्नसराई किंवा सणोत्सवात सोन्याच्या दागिन्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. २०२३ मधील दिवाळीत ६१ ते ६२ हजार रुपये प्रतितोळा असलेले २४ कॅरेट सोने मार्चपर्यंत स्थिर होते. ४ मार्चपासून सोन्याच्या दरात तेजी आली. नंतरच्या महिनाभरात सोने तब्बल आठ ते नऊ हजार रुपयांनी वधारले.
गुढीपाडव्याला ते जीएसटी ७३ हजार ५०० रुपयांवर, तर दि. १७ एप्रिल रोजी ७५ हजार ८०० रुपये प्रतितोळा दरापर्यंत पोहोचले. आता सोनेदरात काहीशी घसरण झाली. उच्चांकीपासून सोने दरात तब्बल ३५०० ते ३७०० रुपयापर्यंतची घसरण दिसून आली.
जळगावातील सोने आणि चांदीचे दर
जळगाव सुवर्णनगरीत सध्या २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ७२,२०० रुपये इतका आहे. तर जीएसटीसह सोने ७४,३६० रुपये इतका आहे. दुसरीकडे चांदीचा दर विनाजीएसटी ८३००० रुपये प्रति किलो इतका आहे. तर जीएसटीसह चांदी ८५,४९० रुपये इतका आहे.