मोठी बातमी ! जळगावात बनावट देशी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मे २०२४ । जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात एका कारखान्यात शीतपेय तयार करण्याच्या नावाखाली चक्क बनावट देशी दारू तयार करून विक्री करण्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला आहे. यावेळी मोठा साठा जप्त करण्यात आला असून पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत असे की, जळगाव शहरातील औद्योगिक वसाहत परिसरातल्या के सेक्टरमध्ये मंदार आयुर्वेदीक प्रॉडक्ट या नावाने कंपनी असून येथे विविध फ्लेवर्सचे शीतपेय तयार करण्यात येत असल्याचे दाखविले जात होते. मात्र प्रत्यक्षात तेथे टँगो संत्रा या ब्रँडची बनावट देशी दारू तयार करण्यात येत होती. यासाठी येथे रसायनांपासून ते पॅकेजींगची सर्व सामग्री असून यातून मोठ्या प्रमाणात प्रॉडक्शन करून ते वितरीत करण्यात येत आहे.
दरम्यान, याबाबतची माहिती राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या पथकाला मिळाली. या माहितीची खातरजमा करून आज जिल्हा प्रशासनाच्या मदतीने सकाळी मंदार आयुर्वेदीक प्रॉडक्ट या कंपनीवर छापा टाकण्यात आला. यात येथे बनावट दारू तयार करणारी सर्व यंत्रणा तसेच सामग्री आढळून आली.
यात तब्बल ५० लक्ष ५९ हजार रूपयांची सामग्री जप्त करण्यात आली असून हा आकडा वाढणार असल्याची शक्यता आहे. या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरूध्द कार्यवाही सुरू झालेली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या कंपनीला भेट देऊन या कार्यवाहीबाबतची माहिती जाणून घेतली.याबाबत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.