जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२४ । सध्या राज्यातील बहुतांश ठिकाणचा पारा 40 अंशाच्या पुढं गेल्याने उन्हाचा चटका असह्य होत आहे. यामुळे नागरिक हैराण झाले आहे. तर दुसरीकडं राज्यात अवकाळी पाऊस पडत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशा स्थिती राज्यात ऊन-पावसाचा खेळ सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.
कुठे पडणार पाऊस?
दरम्यान, हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भातील काही जिल्ह्यात पुढच्या तीन दिवसासाठी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आलाय. काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. नागपूर वेध शाळेने हा ऑरेंज अलर्ट जारी केलाय.
नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यात आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान, या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी योग्य ती खबदारी घ्यावी असं आवाहन देखील प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील काही भागात आज रविवारी सकाळी ढगाळ वातावरण होते. भुसावळ, मुक्ताईनगर तालुक्यासह इतर ठिकाणी सकाळी पावसाच्या सरी बरसल्या. सध्या जळगाव जिल्ह्यासह राज्यात आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. शनिवारी जिल्ह्यातील तापमानात घट होऊन ते ३९.२ अंशपर्यंत नोंदविले गेले. ढगाळ वातावरणामुळे जळगावकरांना दिलासा मिळाला होता. खरंतर हवामान खात्याने जिल्ह्यात ५ एप्रिल ते ८ एप्रिल पर्यंत पावसाचा अंदाज वर्तविला आहे.