जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२४ । कमाल तापमान चाळिशी पार गेल्याने राज्यामध्ये उष्णतेची तीव्र लाट अनुभवायला मिळत आहे. उन्हाच्या झळा चांगल्याच वाढल्यामुळे जळगावसह राज्यातील काही भागात तापमान चांगलंच वाढलं आहे. मात्र याच दरम्यान, वातावरणात बदल होताना दिसत आहे. एकीकडे कडक उन्हाळा जाणवत आहे तर काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्याच्या काही भागात गेल्या दोन दिवसांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आजही विदर्भ मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्याच्या काही भागात उन्हाचा कडाका तर काही भागात गारपिटीची शक्यता आहे.
अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये आज गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर जळगाव, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, लातूर, उस्मानाबाद, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये विजांच्या गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.मुंबई, पुणे, सोलापूर आणि नांदेड या ठिकाणी उन्हाचा कडाका वाढला आहे.
जळगावात उकाडा वाढला
जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात उकाडा बराच वाढला आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पारा ४० अंश सेल्सिअसच्या वर गेल्याचे चित्र आहे. दिवसासह आता रात्रीही हवामानातील उष्णता वाढली आहे. मात्र गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात काही ठिकाणी उन-सावलीचा खेळ आहे. ढगाळ वातावरणाने सरासरी तापमानात काही प्रमाणात घसरले, तरीही ते चाळिशीपार होते. दरम्यान, आगामी तीन दिवस वातावरणात उष्णता कमी राहील, तसेच ढगाळ वातावरण राहील. यामुळे तापमानात घसरण होईल, यानंतर एप्रिलची सुरूवात ढगाळ वातावरणाने होईल. तरीही ४ एप्रिलपर्यंत कमाल तापमान चाळिशीपर्यंत राहील