जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मार्च २०२४ । राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमानाने चाळीशी पार केलीय. यामुळे उन्हाच्या तडाख्यामुळे जनता हैराण झाली आहे. मंगळवारी (ता. २६) जळगाव शहराचे तापमान ४२ अंश नोंदविले गेल्याची माहिती वेलनेस फाउंडेशनचे संचालक, हवामान अभ्यासकांनी दिली. मार्च महिन्यात तापमानाने उच्चांक गाठला, तर एप्रिल, मे महिन्यांत उन्हाची दाहकता कशी असेल यांची चिंता जनतेला लागून आहे.
यंदाच्या मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसाच्या सावटामुळे राज्यातील अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ३१ अंशापर्यंत होता. यामुळे उन्हाच्या चटक्यापासून काहीसा दिलासा मिळाला होता. तसेच रात्रीच्या तापमानात घट झाल्याने उन्हाळ्यात थंडीचा अनुभव जळगावकरांनी अनुभवला होता. मात्र गेल्या काही दिवसापासून जळगावसह राज्यातील अनेक ठिकाणी तापमानाने चाळीशी ओलांडली आहे.
जळगाव जिल्हा दर वर्षी ‘हॉट’ ठरतो. गत वर्षी तापमान ४५ अंशांपर्यंत गेले होते. यंदाही ‘अलनिनो इफेक्ट’मुळे ते ४५ किंवा त्याहीपेक्षा पुढे जाण्याची शक्यता आहे. ‘अलनिनो इफेक्ट’मुळे गत वर्षी एप्रिल महिन्यात पाऊस पडला होता, तर मॉन्सूनची वाटचाल तब्बल एक महिना उशिराने झाली होती. यंदा मात्र ‘अलनिनो इफेक्ट’ पावसाला बाधक ठरणार नाही.यामुळे वेळेवर पाऊस सुरू होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
असे असले तरी मार्च महिन्यातच तापमान ४२ अंशांपर्यंत पोचल्याने आगामी एप्रिल व मे महिना अधिक उष्णतेचा असेल. त्यामुळे नागरिकांनी आतापासूनच उन्हापासून बचावासाठी विविध उपाययोजना सुरू केली आहे.