जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२४ । राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार उद्या मंगळवारी (ता. १९) जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे येणार आहे. मालापूर येथे आदिवासी संस्कृतीचा ठेवा जपणारा उत्सव म्हणजेच भोंगऱ्या बाजाराच्या उद्घाटनासाठी आमदार रोहित पवार येत असल्याची माहिती डॉ. चंद्रकांत बारेला यांनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. आमदार पवार यांचे सकाळी दहाला अरुण गुजराथी यांच्या निवासस्थानी आगमन होईल.
साडेअकराला डॉ. बारेला यांच्या घरी आदिवासी पेहराव परिधान करतील. दुपारी बाराला जनसेवा हॉस्पिटलशेजारीच कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. त्यानंतर मालापूर गावाकडे भोंगऱ्या बाजाराच्या उद्घाटनासाठी रवाना होतील. यावेळी पक्षाचे नेते अरुण गुजराथी, माजी मंत्री एकनाथ खडसे, डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर, सुनील भुसारा, जयंत वानोळे, रवींद्र पाटील, उमेश पाटील, रोहिणी खडसे, वंदना चौधरी यांच्यासह नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती डॉ. बारेला यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी चोपडा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अतुल ठाकरे, समाधान माळी, सचिन दाभे, अमोल राजपूत, राजन पवार उपस्थित होते. या उत्सवातील आदिवासी संस्कृतीचा आनंद घेण्यासाठी सर्वांनी यावे, असे आवाहन डॉ. बारेला यांनी केले.