जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२४ । देशातील विविध राज्यातील वातारणात सातत्यानं बदल पाहायला मिळत असून कुठं उन्हाचा कडाका तर कुठं ढगाळ वातावरण दिसत आहे. महाराष्ट्रात देखील अशीच स्थिती आहे. दरम्यान, उद्यापासून म्हणजे 15 मार्चपासून जळगावसह महाराष्ट्र उष्णता वाढणार असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञांनी दिली आहे.
एल निनोच्या अवशेषांचा हवामानावर प्रभाव पडल्यामुळे जळगाव जिल्ह्यात १५ मार्चपासून उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. १५ मार्चपासून पुढील आठ दिवस पारा ४२ डिग्री सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गेल्या दहा दिवसापूर्वी जळगावचा दिवसाचा पारा ३० अंश सेल्सिअसवर होता. यामुळे उष्णतेपासून जळगावकरांना काहीसा दिलासा मिळाला. तर रात्रीचा पारा देखील घसरल्याने जळगावकरांनी मार्चमध्ये नोव्हेंबर सारख्या थंडीची अनुभूती घेतली.
मात्र गेल्या आठवड्यापासून तापमानात वाढ होताना दिसून आले. आता कमाल आणि किमान तापमानाचा पारा वाढला असून सध्या उन्हाचे चटके चांगलेच झोंबत आहेत. काल बुधवारी जळगावाचे दिवसाचे ३७ अंशापर्यंत गेला. आता उद्या १५ मार्चपासून पुढील आठ दिवस पारा ४२ डिग्री सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे.