⁠ 
रविवार, मे 12, 2024

महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट ; कुठे कोसळणार पाऊस?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२४ । मार्च महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. यात काढणीवर आलेल्या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला. यातच आता महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट चालून आलं. यामुळे शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली आहे.

पुढील दोन ते तीन दिवसांत विदर्भात ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील, असं भारतीय हवामान खात्याने सांगितलं आहे. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पीके काढून घ्यावी असा सल्ला देखील देण्यात आलाय.

सध्या वायव्य राजस्थानमध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव जाणवत असल्यामुळे उत्तरेतील राज्यात मुसळधार पावसासह गारपीट होत आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावर देखील होणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे. हवामान विभागाने पुन्हा विदर्भाला विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. येत्या १६ मार्चपासून ते १८ मार्चपर्यंत विदर्भातील अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांना पावसाचा इशारादेण्यात आलाय. खान्देशातही अवकाळी पावसाची शक्यता आहे.

दुसरीकडे, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत ढगाळ वातावरण राहणार आहे. तर मुंबईसह पुणे शहरातील तापमानात एक ते दोन डिग्रीने घट होणार असून पुढील काही दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्यावर एकीकडे पावसाची शक्यता असतांना दुसरीकडे काही जिल्ह्यातील तापमानात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई, पुणे सोलापूर, मालेगाव, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० डिग्री सेल्सिअसच्या जवळ गेलाय. त्यामुळे नागरिकांना उन्हाच्या झळा बसत आहेत.