अखेरचा जय महाराष्ट्र साहेब…! राज ठाकरेंना पत्र लिहित वसंत मोरेंची मनसेला सोडचिठ्ठी

मार्च 12, 2024 1:59 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२४ । एकीकडे आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असून यातच मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. याच दरम्यान आता राज ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. वसंत मोरे यांनी मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आज सकाळीच वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता वसंत मोरे यांनी पक्षाला रामराम केला आहे.

vasant more 1 jpg webp

मनसेच्या मोजक्या नेत्यांमध्ये वसंत मोरे यांचा उल्लेख व्हायचा. पुण्यातून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी वसंत मोरे इच्छूक आहेत. राज ठाकरे आणि वसंत मोरे यांच्या वारंवार भेटीही झाल्या आहेत. मात्र मनसेकडून मोरेंना उमेदवारी दिली जाणार की नाही? याची चर्चा सुरु असतानाच त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. वसंत मोरे यांची पुढची राजकीय भूमिका काय असेल? ते कोणत्या पक्षात जाणार? हे पाहणं महत्वाचं असेल.

वसंत मोरे यांनी पत्र लिहित मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राज ठाकरे यांच्या फोटोसमोर नतमस्तक होतानाचा फोटो आणि राजीनाम्याचं पत्र वसंत मोरे यांनी ट्विट केलं आहे. अखेरचा जय महाराष्ट्र… साहेब मला माफ करा… असं ते ट्विटमध्ये म्हणालेत.

वसंत मोरे यांचं राजीनाम्याचं पत्र
प्रति, मा. श्री राजसाहेब ठाकरे, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना.
विषय: माझा पक्षाच्या प्राथमिक सदस्य आणि सर्व पदांचा राजीनामा स्वीकारणे संदर्भात.
आपणांस सप्रेम जय महाराष्ट्र..!
पक्षाच्या स्थापनेपासून (किंबहुना त्याही आधीपासून) पक्षाचा सदस्य आणि इतर पदांवर काम करत असताना आपण दिलेल्या जबाबदाऱ्या आणि आदेश यांचे पालन करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत आलो आहे. पक्ष संघटना वाढीसाठी गेली 18 वर्ष सातत्याने काम करत असताना पुणे शहरात आणि सरचिटणीस म्हणून महाराष्ट्रात कार्यरत राहिलो. परंतु अलीकडच्या काळात पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण व पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे. भविष्यात पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून यावेत यासाठी मी स्थानिक पदाधिकाऱ्यांना सामावून घेऊन मदत व उपक्रम देतो, त्यांना ताकद देतो त्या सहकाऱ्यांची शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून ‘कोंडी’ करण्याचे ‘तंत्र’ अवलंबिले जात आहे. म्हणून मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत आहे. कृपया आपण तो स्वीकारावा ही नम्र विनंती.
धन्यवाद..!
आपला विश्वासू, वसंत (तात्या) मोरे कात्रज पुणे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now