जळगाव लाईव्ह न्यूज । १ डिसेंबर २०२३ । राज्यात गेल्या आठवड्यापासून सुरु असलेले अवकाळी पावसाचे संकट अजूनही कायम आहे. अनेक ठिकाणी गारपीट झाल्याने शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळीचं संकट कधी दूर होईल, याची वाट शेतकरी पाहत असताना दुसरीकडे आणखीच चिंता वाढवणारी बातमी आहे. हवामान विभागाने पुन्हा एकदा राज्यात अवकाळीचा इशारा दिला आहे.पुढील २४ तासांत महाराष्ट्रात पावसाची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
आयएमडीच्या अंदाजानुसार, आज म्हणजेच शुक्रवारी विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात पावसाची शक्यता आहे. मुंबई आणि पुण्यातही हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा सरी कोसळण्याची शक्यता आहे. उर्वरीत ठिकाणी दिवसभर ढगाळ हवामान राहण्याचा अंदाज आहे.
उत्तर केरळपासून ते मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे सध्या महाराष्ट्रात पाऊस सुरु आहे. ईशान्य अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर महाराष्ट्रावर हवेची चक्राकार परिस्थिती आहे. त्यामुळे पुढील २४ तासांत महाराष्ट्रात पावसाची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
जळगावातही पावसाचा इशारा :
दरम्यान, गुरुवारी सायंकाळी ६ नंतर जळगाव शहरासह जिल्ह्यातील काही ठिकाणी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. दहा मिनिटामध्ये १० मिमी पाऊस झाला. यावेळी जोरदार वाऱ्यामुळे काही ठिकाणी वृक्ष कोसळल्याच्या घटना घडल्या. दरम्यान, आज शुक्रवारी देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.